The victims include young lawyers and engineers : पीडितांमध्ये वकील, अभियंता तरुणींचा समावेश
Nagpur : मानेवाडातील विकृत समुपदेशक विजय घायवट (४७) हा मानेवाडा रस्त्यावरील बाकडे सभागृहामागे असलेल्या स्वतःच्या घरात विनापरवानगीने निवासी मनोविकास नावाने मानसोपचार केंद्र चालवित होता. त्याच्या अवैध मानसोपचार केंद्रात त्याने आतापर्यंत जवळपास दीडशेवर तरुणींचे लैंगिक शोषण केले आहे. सध्या तो कारागृहात असून त्याची पत्नी व प्रेयसी दोघेही पसार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःला मानसोपचार तज्ज्ञ असल्याचे भासवून विजय घायवटने स्वतःच्या दुमजली घरात मनोविकास मानसोपचार केंद्र सुरू केले होते. या घराला कुठलाही फलक नव्हता आणि या केंद्राबाबत वस्तीत कुणालाही माहितीसुद्धा नव्हती. त्याने गुप्तपणे वरच्या माळ्यावर काही खोल्या काढल्या होत्या. घायवटने सुरू केलेले मनोविकास केंद्रच अवैध आहे. त्याने कोणतीही परवानगी घेतली नव्हती. विनापरवानगीने तो केंद्र चालवत होता. याकडे वैद्यकीय क्षेत्रातील एकाही अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या केंद्रात जवळपास दीडशे मुलींना राहण्याची सोय त्याने केली होती.
Digital Arrest : संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले, ६५ लाखांचा गंडा
गेल्या १५ वर्षांपूर्वी त्याने मनोविकास केंद्र सुरू करून पाचवी ते दहावीतील शाळकरी मुलींवर उपचार करणे सुरू केले. अनेक पालकांनी मुलींना घायवटकडे उपचारासाठी नेले होते. त्याने पालकांचा विश्वास जिंकून मुलींना जाळ्यात ओढले. त्याने नैराश्यात असलेल्या अनेक तरुणींनाही आकर्षित केले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे सुरू केले. सुरुवातीला त्याच्या मनोविकास केंद्रावर मदतनीस असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून तिच्याशी केलेल्या शारीरिक संबंधाच्या जवळपास शंभरावर चित्रफिती तयार केल्या.
ती गर्भवती झाल्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपातही केला. त्या तरुणीचे त्याने मानसोपचार केंद्रात काम करणाऱ्या तरुणाशी लग्न लावून दिले. मात्र, गेल्या डिसेंबर महिन्यात त्याने त्या विवाहित तरुणीला फोनवरुन शारीरिक संबंधाची मागणी केली. ती ‘फोन रेकॉर्डिंग’ तिच्या पतीने ऐकली. त्यामुळे घायवटच्या काळ्या धंद्याचे बिंग फुटले. तरुणीने घायवटच्या लैंगिक अत्याचाराबाबत पतीला सर्व हकीकत सांगितली. त्याने पत्नीला साथ देत हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विजय घायवटला अटक केली. सध्या तो तुरुंगात आहे.
घायवटला पुन्हा अटक !
तोतया समुपदेशक विजय घायवट हा बलात्काराच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात बंद होता. मात्र, न्यायालयाने त्याला ‘प्रोडक्शन वॉरंट’वर तपासासाठी पुन्हा अटक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हुडकेश्वर पोलीसांनी शुक्रवारी दुपारी कारागृहातून विजय घायवटला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या तरुणींची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होणार, हे निश्चित.
जाळ्यात उच्चशिक्षित युवती
विजय घायवटच्या जाळ्यात सर्वाधिक वकील आणि अभियंता तरुणी अडकल्या होत्या. घायवटला पोलिसांनी ताब्यात घेताच पोलीस ठाण्यात काही महिला वकील आणि अभियंता तरुणी आल्या होत्या. त्याच तरुणींनी घायवटच्या आई-वडिलांची समजूत घालून पाठीशी असल्याचे सांगितले होते. तसेच त्याची पत्नी मृणाल हिलाही मदत केली होती.
नातेवाईकांचा शेजाऱ्यांवर हल्ला
विजय घायवटला पोलिसांनी अटक केल्यानंतर शेजारच्या घरात तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याचे शेजाऱ्यांना माहीत पडले. तरीही घायवटच्या घरी अनेक तरुणींची गर्दी सुरूच होती. तसेच शेजाऱ्यांनी त्यांच्या घराजवळ उभे राहिल्यास घायवटचे नातेवाईक त्यांना शिवागाळ करीत होते. एका शेजारी महिलेवर तर वायवटच्या बहिणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून घायवटचे आईवडील अचानक घरात दिसत नसल्याची माहिती समोर आली आहे.