Pune land scam : ‘गेम’ करायचा असेल तर होते सुपरफास्ट कारवाई

Rohit Pawars attack on Pune land scam: रोहित पवारांचा पुणे जमीन घोटाळ्यावर हल्लाबोल

Pune : पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणावरून राज्यात राजकीय वादळ उठलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. “कुठलाही नेता असो किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती असो, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. पण, ती कारवाई करताना भेदभाव होऊ नये. मात्र या सरकारकडून निवडक लोकांवरच कारवाई केली जाते,” असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

मुंढवा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया होल्डिंग्स एलएलपी’ कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच सुपरफास्ट कारवाई केली जाते. पण मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींवर मात्र काहीच होत नाही. आम्ही सिडकोचं प्रकरण पुढे आणलं, पण तिथं काही झालं नाही. मात्र, पुणे प्रकरणात कारवाई झपाट्याने झाली.”

Pune land scam : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात एका पैशाचाही व्यवहार नाही

रोहित पवार पुढे म्हणाले, “कारवाई कोणावरही व्हावी, पण ती पक्ष पाहून होऊ नये. जो चुकीचा आहे तो चुकीचाच आहे. सत्तेतला असो, विरोधातला असो कायद्यापुढे सगळे समान असायला हवेत. मात्र आजचं सरकार भेदभावाच्या पद्धतीने वागत आहे.”

राज्य सरकारच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी म्हटलं, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक जमीन घोटाळे झाले आहेत. या सर्व घोटाळ्यांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. या सरकारचं ब्रीदवाक्यच झालंय ‘करूया वोट चोरी, करूया जमिनीची लुटमारी.’ आजच्या सरकारमध्ये गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन, अशी परिस्थिती आहे.”

त्यांनी भाजपवर टीका करताना उपरोधिक भाषेत म्हटलं, “अमित शाह यांनी सांगितलं की भाजपला आता ‘कुबड्यांची गरज नाही’. पण भाजप इथे ‘कुबड्या’ म्हणजे मित्रपक्ष मोडायचा प्रयत्न करत आहे. काहींना वाटलं होतं आदराने भिंतीवर टांगतील, पण इथे भाजप कुबड्या तोडून चुलीत घालत आहे.”

रोहित पवार यांनी या प्रकरणातील चौकशी आणि जबाबदारीबाबतही ठोस मत मांडलं. “कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नाही. काही अधिकारी या गोष्टींना पाठिंबा देतात, काहींवर दबाव टाकला जातो. गरीबाचं काम का होत नाही आणि काही विशिष्ट लोकांचंच काम का होतं, हे शोधणं महत्त्वाचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.

सरकारी जमिनींच्या गैरवापराबाबत ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना माझं एकच सांगणं आहे ज्या-ज्या ठिकाणी सरकारी किंवा कुळाच्या जमिनी आहेत आणि त्या अनधिकृतरीत्या घेतल्या गेल्या आहेत, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. मुंबईत भाजपने उभारलेल्या कार्यालयाच्या जमिनीबाबतही सरकारने स्पष्टीकरण द्यावं. कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने सरकारी जमिनी ताब्यात घेणं योग्य नाही.”

Criticism on NCP : राजकारण तापले, राष्ट्रवादीवरील तीव्र टीका भोवनार

या वादावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबतही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “आई म्हणून सुप्रिया ताईंनी भावनिक प्रतिक्रिया दिली, पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली. शरद पवार साहेबांनी स्पष्ट राजकीय भूमिका व्यक्त केली, आणि आम्ही त्यांच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते आहोत,” असं त्यांनी म्हटलं.

मुंढवा जमीन प्रकरणावरून अजित पवार-पार्थ पवार कुटुंबावर टीका होत असतानाच रोहित पवारांनी भेदभावमुक्त आणि पारदर्शक चौकशीची मागणी करत सरकारवर लक्ष्य साधलं आहे. त्यामुळे या वादाला आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील राजकीय परस्परसंवादाची नवी छटा प्राप्त झाली आहे.