Pune land scam : “आता माघार नाही”…घोटाळा हायकोर्टात नेण्याचा निर्धार !

anjali damania pune land scam high court petition ajit pawar political storm : अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचे आव्हान स्वीकारले

Mumbai : मुंढवा आणि कोरेगाव जमीन घोटाळ्याचे पडसाद राज्यात अजूनही शांत व्हायचे नाव घेत नाहीत. या प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या या संघर्षात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मैदानात उतरल्या असून, राष्ट्रवादीने दिलेले आव्हान स्वीकारत त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठवण्याची घोषणा केली आहे.

मुंढवा जमीन व्यवहारातील गैरव्यवहार हे ओपन अँड शट प्रकरण असल्याचा दावा करत दमानिया म्हणाल्या की संपूर्ण व्यवहार खोट्या कागदपत्रांवर आधारित होता. एलओआय, सेल डीड आणि ताब्यापर्यंत सर्व कागदपत्रे फसवी बनवून हा व्यवहार राबवण्यात आला, असा गंभीर आरोप त्यांनी पुन्हा उच्चारला. या घोटाळ्यात कलेक्टरपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत सहभाग होता, तसेच या व्यवहारामागे पार्क कंपनीला राजकीय संरक्षण मिळाले, अशी सरळ बोट ठेवणारी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

Local body election : निवडणूक कामावर नाही… निधीवर लढवली जातेय!

या सर्व प्रकाराची संपूर्ण जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी दमानियांची मागणी राष्ट्रवादीने फेटाळल्यानंतर नव्या वादाची ठिणगी पडली. पुरावे असतील तर हायकोर्टात जावे, या राष्ट्रवादीच्या भूमिकेला उत्तर देताना दमानियांनी थेट आव्हान स्वीकारले आणि आठ दिवसांत हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला.

दमानिया म्हणाल्या की कोणत्याही सरकारला अशा चौकशीला रोखण्याचा अधिकार नसावा. चौकशीचा अधिकार फक्त न्यायालयाकडे असावा अशी मागणी त्या याचिकेत करणार आहेत. सिंचन घोटाळ्याप्रमाणे ही लढाईही शांतपणे पण ठामपणे लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पक्षांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची भाषा करताना प्रत्यक्षात खंडणी, धमक्या आणि गुंडगिरीचा अवलंब केल्यावर लोकशाहीची मर्यादा खालावते, अशी टीका करत दमानिया पुढे म्हणाल्या की निवडणुकीतील पैशांच्या उधळपट्टीत काही नेत्यांनी नैतिक जबाबदारी उचलली पाहिजे.

Local body election : कमळाचं बटन दाबा अन् राष्ट्रवादीला विजयी करा!

त्यांनी निवडणूक आयोगालाही थेट लक्ष्य केले. “इलेक्शन कमिशनकडे पुरेसे धैर्य आणि ताकद असेल तर पुरावे समोर असताना कारवाई व्हायलाच हवी; अन्यथा ‘न खाऊंगा ना खाने दूंगा’ ही घोषणा मतदारांसाठी फसवी ठरेल.” अशा शब्दांत दमानियांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर रोख निशाणा साधला.

“सत्य बाहेर येईपर्यंत मी ही लढाई थांबवणार नाही,” असा स्पष्ट आणि ठाम इशारा देत दमानिया यांनी या प्रकरणाचे पडसाद पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट केली आहेत.