Dadas urgent meeting with Fadnavis in land scam case : जमीन घोटाळा प्रकरणात दादांची फडणवीसांसोबत सोबत तातडीची भेट
Mumbai: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत. या प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि शरद पवार गटाचे एकनाथ खडसे यांनी अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आज अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पार्थ पवार यांच्यावरच्या कथित जमीन घोटाळ्यामुळे उपमुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी थेट निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी “या व्यवहारासंदर्भात आपल्याला काही माहिती नाही आणि आपला त्याच्याशी संबंध नाही,” असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, विरोधकांनीच प्रश्न उपस्थित केला आहे की, “पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या घरातच ३०० कोटींचा व्यवहार होतो, आणि त्यांना माहिती नसते, हे कसं शक्य आहे?”
Munde Vs Jarange : माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला !
या घोटाळ्याचं मूळ पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीच्या व्यवहारात आहे. बाजारभावानुसार सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला फक्त ३०० कोटी रुपयांत मिळाली, असा आरोप आहे. याहूनही गंभीर म्हणजे या व्यवहारासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ ५०० रुपये भरल्याचं उघड झालं आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं, “एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढी मोठी जमीन खरेदी कशी करू शकते? उद्योग संचालनालयाने ४८ तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि केवळ २७ दिवसांत व्यवहार पूर्ण झाला हे सर्व कोणाच्या वरदहस्तामुळे?”
दानवे यांनी पुढे आरोप केला की, पार्थ पवारांच्या कंपनीकडून या जमिनीवर आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू होती. एवढा मोठा व्यवहार एका अल्प भांडवलाच्या कंपनीकडून शक्य नाही, हे स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांच्या थेट हस्तक्षेपाकडे निर्देश करतं.
दरम्यान, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज झालेल्या भेटीत नेमकं काय चर्चिलं गेलं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले असले तरी विरोधकांचा दबाव वाढत असून, उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
“पुण्यात Another land scam : आणखी एक जमीन घोटाळा! कृषी विभागाची ५ एकर जमीन हडप !
पुण्यातील या जमिनीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकीय तापमानात मोठी वाढ केली आहे. एकीकडे अजित पवार स्पष्टीकरण देत आहेत, तर दुसरीकडे विरोधक चौकशीसह राजीनाम्याची मागणी करत असून, आगामी दिवसांत या घोटाळ्याचा राजकीय परिणाम मोठ्या प्रमाणात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.








