Former minister warns of defamation against Pune Police : एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं; रेव्ह पार्टीवरील कारवाई पूर्वनियोजित असल्याचा आरोप
Pune: खराडी परिसरातील एका प्रायव्हेट बंगल्यावर पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात आणि पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ही कारवाई पूर्वनियोजित आणि बदनामी करण्याच्या हेतूनेच झाल्याचा दावा केला आहे.
एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की, त्यांचा कोणत्याही मंत्र्यावर आरोप नाही, मात्र पुणे पोलिसांच्या भूमिकेवर त्यांना गंभीर शंका आहे. कोणताही ऑर्केस्ट्रा संगीत नव्हते, आवाज नव्हता, मग रेव्ह पार्टी म्हणजे काय हे मला पुणे पोलिसांनी सांगावं, असं म्हणत खडसेंनी पोलिसांवर थेट आरोप करत ही संपूर्ण कारवाई ही केवळ खडसे कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्यासाठीच केली गेल्याचा आरोप केला. माझ्या जावयाकडे काहीच सापडलं नाही. एक मुलगी होती तिच्याकडे गांजा सापडला. मग त्याचा संबंध प्रांजल खेवलकर यांच्याशी कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
खडसे यांचा आणखी एक गंभीर आरोप म्हणजे, प्रांजल खेवलकर यांच्यावर काही काळ पाळत ठेवली जात होती. सिव्हिल ड्रेसमधील पोलीस सतत माझ्या जावयावर नजर ठेवत होते. हा एक कट रचला गेला आहे. माझ्या कुटुंबीयांचे फोटो बाहेर कसे जात आहेत? कोणी तरी यात सूत्रधार आहे, असं खडसे यांनी ठामपणे म्हटलं. त्यांनी पोलीस विभागाच्या निवडक तत्परतेवरही टीका करत म्हटलं की, रेव्ह पार्टी प्रकरणात एवढ्या तत्परतेने पोलिसांनी छापा टाकला, पण लोढा प्रकरणात अशी तत्परता का दाखवली नाही?
Protest in Malkapur : मलकापूरात ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेची जोरदार निदर्शने
प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाईसंदर्भात खडसे यांनी पोलिसांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, जाणीवपूर्वक रेव्ह पार्टीचं लेबल लावून आमचं नाव खराब केलं जातंय. हे कुटुंब आणि माझं राजकीय भविष्य डागाळण्याचा प्रयत्न आहे. मी आता याविरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहे.
Kirit Somaiya : वर्षभरात १० लाख रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र?
दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत एकूण 9 जणांना ताब्यात घेतलं असून, यामध्ये काही महिला सहभागी होत्या, असं अधिकृतरित्या सांगितलं गेलं आहे. काहीजणांकडून अंमली पदार्थ सापडल्याचा पोलिसांचा दावा आहे, मात्र संबंधित अंमली पदार्थांचा संपूर्ण तपशील अजून स्पष्ट झालेला नाही. खेवलकर यांच्या जामिनाबाबत न्यायालयात सुनावणी होणार असून, त्याच्या आधीच राजकीय वातावरण तापलं आहे.








