Medha Kulkarni burst into tears, please keep some boundaries. :थोड्या तरी मर्यादा ठेवा, खा. मेधा कुलकर्णींना रडू कोसळले
Pune : नुकत्याच झालेल्या रेल्वेच्या विभागीय बैठकीत पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी खा. मेधा कुलकर्णी यांनी केली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले, तसेच काही संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशन साठी वेगवेगळ्या नावांची सूचना केली. ‘ पुण्यातील बुधवार पेठेला मस्तानी चे नाव द्या’ अशा आशयाचे बॅनर झळकवले. त्यावर बोलताना कुलकर्णी भाऊक झाल्या. ज्या पद्धतीने टीका झाली ते पाहून त्यांना अक्षरशः रडू कोसळले. समोरच्यावर टीका करताना थोड्या तरी मर्यादा ठेवा! असे आवाहनही त्यांनी केले.
मेधा कुलकर्णी यांनी रेल्वेच्या बैठकीत पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचे नाव देण्याची अनेक संघटनांची मागणी आहे अशी बाजू मांडली. त्यावरून पुण्यात राजकारण तापले आहे. पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुलेंचे नाव द्यावे, तसेच राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी समोर आली. तसेच पुण्यात ‘पोस्टर वॉर’ सुरू झाले. पेशव्यांच्या नावाला विरोध म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकले . ‘कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा!’ असा मजकूर त्यावर होता हे बॅनर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने लावण्यात आले होते.
Hindi controversy : राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही
बॅनरच्या माध्यमातून झालेल्या टिके बद्दल प्रथमच मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच बॅनर वरील मजकुराबद्दल बोलताना त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. पुणे रेल्वेस्टेशन ला सध्या नावच नाही, त्यामुळे बाजीराव पेशव्यांचे भूषणावह नाव द्यावे असे मत मी मांडले. कोणीही आपलं मत मांडू शकतो, त्यावर टीका होऊ शकते.पण मस्तानीचे नाव बुधवार पेठेला द्या अशी टीका कितपत योग्य आहे असे म्हणत त्या भावुक झाल्या. मी फक्त मागणी समोर ठेवली, निर्णय घेणारे लोक वेगळे आहेत, आमच्यावर टीका होऊ शकते पण त्याला काहीतरी मर्यादा ठेवा. मी सुमारे 30 वर्षापासून राजकारणात आहे.मी परदेशातही गेले तर साडी नेसून जाते, मात्र माझे पोस्टर लावताना, माझे कपडे बदलून पोस्टर लावले हा अश्लील प्रकार आहे म्हणून अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. टीकेला मर्यादा तर ठेवा! महिला वर्ग म्हणून मी बोलते असे सांगताना त्यांना रडू कोसळले.
__