Rahul Narvekar : हास्यास्पद आरोप पराभव झाकण्यासाठीच केले जातात !

Narvekar finally breaks silence on viral video of intimidation : धमकावण्याच्या व्हायरल व्हिडिओवर अखेर नार्वेकर यांनी सोडलं मौन

Mumbai : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडणुका, धमकावण्याचे आरोप आणि व्हायरल व्हिडिओ यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, या संपूर्ण प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर मौन सोडलं आहे. मुंबई महापालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी घडलेल्या कथित वादावरून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र हे आरोप पूर्णतः हास्यास्पद असून आपला पराभव झाकण्यासाठीच केले जात असल्याचा पलटवार राहुल नार्वेकर यांनी केला आहे.

जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, त्या संदर्भात निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर यांनी, निवडणूक आयोग हे एक स्वायत्त घटनात्मक आहे आणि आयोग आपलं काम योग्य पद्धतीने करेल, असं स्पष्ट केलं.
दरम्यान, माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर थेट धमकावल्याचा आरोप केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा राठोड यांनी केला. राहुल नार्वेकर हे भाजपच्या उमेदवारांसोबत तिथे आले होते. त्याचवेळी हरिभाऊ राठोडही तेथे पोहोचले. नार्वेकर हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथे येरझाऱ्या घालत होते. मला त्यांनी थेट धमकी दिली. ‘तुम्हाला सिक्युरिटी कोणी दिली?’ असा सवाल त्यांनी मला केला, असा गंभीर आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Ajit Pawar vs Ravindra Chavan : रवींद्र चव्हाणांनी दादांना खडसावलं

या सर्व आरोपांना उत्तर देताना राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे हास्यास्पद आहेत. आपला पराभव लपवण्यासाठी काही लोक असे आरोप करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुंबईत ३६ आमदार आहेत आणि प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातील उमेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी जातो. मी कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे माझ्या उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी जाणं हे स्वाभाविक आहे, असं त्यांनी सांगितलं.
प्रत्येक उमेदवाराला अपेक्षा असते की त्यांचा आमदार त्यांच्या सोबत असावा. त्याच पद्धतीने मीही माझ्या उमेदवारांसोबत गेलो होतो. निवडणूक आयोगाचा स्पष्ट नियम आहे की एका उमेदवारासोबत दोन व्यक्तींना जाण्याची परवानगी असते. त्या नियमांच्या चौकटीत राहूनच आम्ही तिथे गेलो होतो, असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं.

मात्र RO कार्यालयातून बाहेर येत असताना माजी विधानपरिषद सदस्य आणि त्यांच्या सोबत आलेल्या टोळीने मला घेरलं. धक्काबुक्की करण्यात आली, घेराव घालण्यात आला. मला दिलेल्या सुरक्षेचा दुरुपयोग केला गेला. हा कोणता योग्य प्रकार आहे? असा सवाल राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला. कोणी जर सुरक्षेचा किंवा अधिकारांचा दुरुपयोग करत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांना सांगून कारवाई करण्यास सांगणं हे माझं कर्तव्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना राहुल नार्वेकर यांनी हरिभाऊ राठोड यांच्यावरही सवाल केला. जर माझं पोलिंग स्टेशन किंवा RO कार्यालयात जाणं अनुचित होतं, तर हरिभाऊ राठोड तिथे पूजा करायला गेले होते का? असा टोला त्यांनी लगावला. संविधानाचा भंग होईल असं कोणतंही कार्य आम्ही कधीच करणार नाही. उलट विधानसभा अध्यक्षांना घेराव घालणं, त्यांच्याशी हुज्जत घालणं, RO ला बाहेर पडू न देणं, तुम्हाला हलू देणार नाही अशी भाषा करणं, हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut : अजित पवारांनी मूळ राष्ट्रवादीत यावं…

दरम्यान, बिनविरोध निवडणुका, धमकावण्याचे आरोप आणि व्हायरल व्हिडिओ यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आलेल्या अहवालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अहवालातून नेमकं काय निष्पन्न होतं आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष केंद्रीत झालं आहे.