Demand to hold elections without clean voter list : मतदारयादी स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुकांना घेण्याची मागणी
Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मतदारयादीबाबत धक्कादायक आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने जून महिन्यात मतदार नोंदणी प्रक्रिया बंद करून तब्बल ९६ लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुंबईत रविवारी आयोजित मनसे पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “आम्ही या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे दाद मागायला गेलो, तर सत्ताधारी नेते आमच्यावरच टीका करतात. कारण त्यांना माहित आहे की त्यांनी शेण खाल्लंय. त्यामुळे आमचे आरोप त्यांच्या मनाला टोचतात.” त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधील हे साटेलोटं उघड करणे आता आवश्यक आहे.
राज ठाकरेंनी मनसेच्या यादीप्रमुखांना निर्देश देत सांगितले की, “महानगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रत्येक घरात जा आणि तपासा मतदार यादीत ज्या लोकांची नावे आहेत, ते खरोखर त्या पत्त्यावर राहतात का? माझी मतदारांना विनंती आहे की, या तपासणीत सहकार्य करा. सत्ताधाऱ्यांनी जे शेण खाल्लंय ते बाहेर काढायचं काम आपण करायचं आहे.”
Local Body Elections : सावनेरमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला !
ते पुढे म्हणाले, “मतदारयादी स्वच्छ झाल्याशिवाय आणि समाधान झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. जर स्वच्छ यादीशिवाय निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला, तर मी बघतो निवडणुका कशा होतात त्या.”
या मेळाव्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला, ज्यात मोदींनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली होती. तसेच, महायुतीतील काही नेत्यांचे व्हिडिओ दाखवून मतदारयादीत झालेल्या फेरफारांचा पुरावा त्यांनी सादर केला.
Dr. Nitin Raut : ‘नमकहराम’ वरून भडकले काँग्रेसचे आमदार डॉ. राऊत !
राज ठाकरेंनी यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्पावरूनही भाजपवर निशाणा साधला. “मी बुलेट ट्रेनला विरोध केला होता, कारण त्या पट्ट्यात मोठा भूखंड घोटाळा आहे. तिथे नवे विमानतळ तयार करतील, सांताक्रुझचे ऑपरेशन कमी करून ते नवी मुंबईला नेतील, कार्गो वाढवणला हलवतील आणि मग सगळी जमीन अदानीच्या घशात जाईल,” असा आरोप त्यांनी केला.
भाजपला मतदान करणाऱ्या मराठी मतदारांनाही त्यांनी इशारा दिला. “हा गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरायला लागला आहे. एकदा तो फिरला की, त्याखाली तुम्हीसुद्धा याल,” असे राज ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “महायुतीचे २३२ आमदार निवडून आले, तरी राज्यात जल्लोष झाला नाही. कारण हे लोक स्वतःही जाणतात की ते कसे जिंकले. निवडणुका बोगस मतदारांवर चालवल्या जात असतील, तर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार?”
राज ठाकरेंच्या या आक्रमक भाषणानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मतदारयादीतील कथित बोगस नोंदींचा मुद्दा आता राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चर्चेचा विषय ठरत आहे.
______