Mahayuti adopts no risk policy to prevent the influence of ‘Brand Thackeray’ : ‘ब्रँड ठाकरे’चा प्रभाव रोखण्यासाठी महायुतीचे ‘नो रिस्क’ धोरण
Mumbai : राज ठाकरे यांनी नुकतीच ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एका सामान्य शुभेच्छा भेटीतून राजकीय गरमागरम चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीने ठाकरे बंधूंमधील वाढती जवळीक अधोरेखित झाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-मनसे युतीची शक्यता व्यक्त होत असताना महायुती पण सतर्क झाले आहे. ठाकरे ब्रँड चा प्रभाव रोखण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे.
ठाकरे बंधूंनी जर हात मिळवणी केली, तर मुंबईसारख्या संवेदनशील राजकीय भागात महायुतीचा गेम बिघडू नये यासाठी, महायुतीने ‘ नो रिस्क’ धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे मुंबईत शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत. महायुतीच्या नेत्यांना हे स्पष्ट झाले आहे की, स्वतंत्रपणे लढल्यास मतविभाजन होईल आणि त्यात ठाकरे बंधूंना फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये समन्वयातून उमेदवारी, प्रचार आणि मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या देण्याची रणनीती आखली जात आहे. शिंदे गटाच्या मुंबईतील हालचाली गेल्या काही दिवसांपासून मंदावल्या आहेत, त्यामुळे ठाकरे युतीचा फटका आधीच जाणवायला लागला आहे.
Devendra Fadanvis : महाराष्ट्राच्या मनात काय, हे ‘स्थानिक’च्या निवडणुकांमध्ये दिसेल !
महायुती आता केवळ एकत्र लढण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ठाकरे ब्रँडवर थेट हल्ला करण्याची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कारभाराचा पोलखोल करण्याची मोहीम सुरू होणार आहे. प्रत्येक वॉर्डातील आमदार आणि कार्यकर्त्यांना आगामी काळात महायुतीने काय केलं? हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या काळात कोकणी मतदार, सार्वजनिक मंडळं, गणेश मंडळं यांच्याशी जवळीक साधण्यासाठी एसटी बस, लोकल गाड्या मोफत उपलब्ध करून देण्याचाही विचार सुरू आहे.
मराठी माणूस कोणाच्या बाजूने हे दाखवायचं आणि ठाकरे बंधूंच्या भावनिक राजकारणाला प्रतिउत्तर द्यायचं. असे प्राथमिक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत हे स्पष्ट झालं की, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी त्यांचं वर्चस्व मुंबईत सत्तेत रूपांतरित होईलच, असं नाही. भाजप आमदारांनी सुचवलं की, युती झाली तर मतांचं ध्रुवीकरण होईल, आणि त्याचा फायदा भाजपलाही बसू शकतो. पण धोका नको म्हणूनच महायुती आता सावध खेळ खेळत आहे.
भाजपने एक वेगळीच चाल खेळली आहे. मुस्लिम, उत्तर भारतीय व हिंदी पट्ट्यात स्वबळावर उमेदवार उतरवून त्यांना आकर्षित करायचं आणि मराठी पट्ट्यात ठाकरे गट व मनसेतील असंतुष्टांना गळाला लावायचं, असा प्लॅन तयार आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकीमुळे जे काही वातावरण तयार झाले आहे, त्यात महायुतीला अडकवू द्यायचं नाही, हे स्पष्ट आहे. एकंदरीत, राज ठाकरे ‘मातोश्री’वर पोहोचताच महायुतीने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. ‘ ब्रँड ठाकरे’ पुन्हा उभा राहत असेल, तर त्याला रोखण्यासाठी कसलेही धोके न पत्करता पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्धार केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.