MNS-leader-slams-maharashtra-government-over-mumbai-pune-expressway-mess-and-toll-policy : टोल वसुलीत तत्परता, मग सुविधा देण्यात कसूर का?, अभूतपूर्व कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा टोल परत करण्याची मनसे प्रमुखांची मागणी
Mumbai मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३२ तासांच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “दोन प्रमुख शहरांना जोडणारा रस्ता इतका वेळ ठप्प राहणे आणि सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेणे, हा प्रशासनाचा कोडगेपणा आहे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे वाभाडे काढले आहेत.
मंगळवारी, ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातानंतर ३२ तास रस्ता बंद राहिल्याने राज ठाकरे यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अपघातानंतर रस्ता तात्काळ मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडे कोणताही ठोस कृती आराखडा (Action Plan) नव्हता का?” असा बोचरा सवाल त्यांनी केला. सरकारकडून नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश दिले जातात, पण यातून प्रशासन कधी धडा घेणार, असा प्रश्न त्यांनी विचारला.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये टोलच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. “रस्ता बांधणे आणि टोल वसुली करणे इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? टोलच्या बदल्यात प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या प्रवाशांनी ३२ तास या कोंडीत अन्न-पाण्याविना हाल सोसले, त्यांचा टोल सरकारने परत करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
अर्थसंकल्पातील हायस्पीड ट्रेनच्या घोषणेवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “भविष्यातील योजनांचे स्वप्न दाखवण्यापेक्षा आधी रस्ते प्रवास शाश्वत करा. आज मुंबई-पुणे प्रवास किती वेळात पूर्ण होईल याची शाश्वती राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.”
Sunetra Pawar oath : तातडीचा निर्णय नव्हता; सर्व प्रक्रिया नियमानुसारच
राज्यात पालकमंत्री आणि मोठे प्रशासन असतानाही प्रवाशांना निराधार सोडावे लागते, ही शोकांतिका असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले. “टोल घेणाऱ्या कंपन्या आणि सरकार यांनी प्रवाशांप्रती आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला.








