Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी; ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘आयाराम’ वाद पेटणार?

rajya-sabha-election-2026-bjp-maharashtra-loyalists-vs-newcomers-debate : महायुतीत ४:१:१ चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता; विनोद तावडे, भागवत कराड यांच्या नावांची चर्चा

Mumbai मार्च २०२६ मध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याचे चित्र असून, यावेळी बाहेरून आलेल्या नेत्यांऐवजी पक्षातील निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी मागणी अंतर्गत गटातून पुढे येत आहे. मागील काही वर्षांत राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी बाहेरून पक्षात दाखल झालेल्या नेत्यांना संधी दिल्याची खंत काही जुन्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ६ मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ९ मार्च ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठीची ही निवडणूक सत्तासमीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Ladki bahan Yojana : ई-केवायसीनंतर लाडक्या बहिणींची संख्या 86 लाखाने घटली !

भाजपकडून संभाव्य उमेदवारांमध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील या नावांची जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत रस्सीखेच वाढण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेचे एकूण संख्याबळ २८६ असून दोन जागा रिक्त असल्याने प्रभावी संख्या २८४ आहे. एका उमेदवाराला विजयासाठी ३७ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे २३५ आमदारांचे बळ असल्याने सहा जागांवर विजय मिळवणे शक्य असल्याचे गणित मांडले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जागावाटप ४:१:१ या फॉर्म्युल्यानुसार होण्याची शक्यता असून त्यात भाजपला चार, शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक जागा मिळू शकते.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडे एकत्रित ४६ मतांचे बळ असून एक जागा निश्चित मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार, फौजिया खान, रजनी पाटील आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह काही विद्यमान सदस्यांची मुदत संपत असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Buldhana Congress : बुलढाणा काँग्रेसमध्ये खांदेपालटाची तयारी; अंतर्गत कलहामुळे नवे आव्हान

दरम्यान, भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध आयाराम’ हा मुद्दा यावेळी केंद्रस्थानी आला आहे. दीर्घकाळ संघटनात्मक काम केलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे, अशी भावना पक्षातील एका गटात तीव्र होताना दिसत आहे. केंद्रीय नेतृत्व अंतिम निर्णय घेताना कोणत्या निकषांना प्राधान्य देते आणि चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणाला संधी मिळते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.