Rajya sabha election : शरद पवारांमुळेच प्रियंका चतुर्वेदींना डच्चू; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

sanja-raut-claims-priyanka-chaturvedi-candidature-missed-due-to-sharad-pawar : महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव? राज्यसभा उमेदवारीवरून नवा पेच

Mumbai राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या ताज्या विधानाने नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. भारतीय जनता पक्षाने विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर राऊत यांनी या निर्णयाचे जाहीर कौतुक केले आहे. तावडे हे अभ्यासू आणि अनुभवी नेते असून त्यांना संधी देऊन भाजपने राजकीयदृष्ट्या योग्य पाऊल उचलल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, विरोधी पक्षाचा नेता असूनही राऊत यांनी तावडेंच्या राजकीय प्रवासाचा गौरव केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत यांनी तावडेंच्या संघर्षावर भाष्य करताना म्हटले की, महाराष्ट्रातील एका विशिष्ट गटाने विनोद तावडे यांना मुख्य प्रवाहातील राजकारणातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, तरीही नाउमेद न होता त्यांनी पक्ष संघटनेचे काम निष्ठेने सुरू ठेवले. आज त्यांना दिल्लीत केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले असून, जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या कामाचा गौरव होतो, तेव्हा त्याचे कौतुक झालेच पाहिजे. भाजपचे राज्यसभेचे उमेदवार निवडीबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या रणनीतीला दाद दिली.

Anandrao Adsul : दोन वर्षांत दहा राज्यपाल झाले, पण माझा नंबर कधी लागेल?

मात्र, तावडेंचे कौतुक करतानाच राऊत यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत गणितांवरही भाष्य करत खंत व्यक्त केली. शिवसेनेच्या विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी न मिळाल्याबाबत त्यांनी सूचक विधान केले. “प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी सर्वांच्याच प्रार्थना होत्या. त्या आमच्या उत्कृष्ट सहकारी आहेत आणि त्यांनी राज्यसभेत प्रभावी काम केले आहे. मात्र, दुर्दैवाने राजकीय गणित जुळत नसल्याने त्यांना यावेळी बाहेर बसावे लागले,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. चतुर्वेदी यांच्या उमेदवारीवरून आघाडीत काही पेच असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.

Mahayuti government : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, जीआर निघाला, मात्र अनुदान निघालेच नाही, भाजपचे आमदारच हतबल

राऊत यांनी या निर्णयाचे खापर अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या भूमिकेवर फोडल्याचे दिसून आले. “जर शरद पवार नसते, तर शिवसेनेने १०० टक्के निवडणूक लढवून प्रियंका चतुर्वेदी यांना जागा दिली असती. ही जागा शिवसेनेने लढवावी अशी आमची तीव्र इच्छा होती, पण महाविकास आघाडीत शरद पवारांना पाठिंबा दिला पाहिजे, असा निर्णय सामूहिकरीत्या घेण्यात आला,” असे राऊत यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे आघाडीतील जागावाटपाचे आणि समन्वयाचे पेच आता चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडी आगामी निवडणुकीत आपली रणनीती कशी आखते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.