Farmers should be prepared to fight for rights, not for suicide : बेलोरा येथील शेतकरी-शेतमजूर महिला सभेत टिकैत यांचे आवाहन
Amravati “शेतकऱ्यांनो, हक्कांसाठी लढण्याची तयारी ठेवा, आत्महत्येची नाही. विदर्भातील जनतेत आंदोलनाचा करंट आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासनावर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणण्याची वेळ आली आहे,” असे स्पष्ट मत राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी व्यक्त केले. ते चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथे आयोजित शेतकरी-शेतमजूर महिला सभेत बोलत होते.
मंचावर राकेश टिकैत यांच्यासह डॉ. अशोक ढवळे, माजी मंत्री महादेव जानकर, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “जात-पातीसाठी एकत्र येणाऱ्या नागरिकांनी आता शेतकऱ्यांसाठी एकत्र यावे. पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा गाजावाजा होत असताना दुसरीकडे एका दिवसात १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात शेतकरीहिताचे सरकार नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेण्याशिवाय पर्याय नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
Municipal Corporation Election : अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष !
“शेतकऱ्यांपाठोपाठ आता महिलांनीसुद्धा सरकारच्या धोरणांविरोधात ताठर भूमिका घेणे आवश्यक आहे. यासाठी पुरुषांसोबत महिला शेतकरी-शेतमजूरांनीही पुढे यावे. बळीराजाच्या जिवाशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी २८ ऑक्टोबरला नागपूर येथे मोठे आंदोलन होणार आहे,” असे आवाहन बच्चू कडू यांनी सभेत केले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. यासाठी अमरावतीत वाडा आंदोलन, रायगड येथे तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन, लोकप्रतिनिधींच्या घरासमोर टेंभा आंदोलन, मोझरी येथे सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन यासह अनेक आंदोलने झाली. तसेच कृषिमहर्षी पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ ते साहेबराव करपे-पाटील यांच्या चिलगव्हाण (जि. यवतमाळ) या गावापर्यंत सातबारा कोरा यात्राही काढण्यात आली होती.








