Take strict action against Congress state president Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाईची करा, आमदार सावरकरांची सभागृहात मागणी
Akola काँग्रेसच्या आकांना खूश करण्यासाठी तसेच औरंगजेबच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान केला. त्यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप विधिमंडळाचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात केली.
अबू आजमी यांच्यावर जसे कठोर पाऊल उचलण्यात आले, तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही. सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तीविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित वक्तव्यावरील कारवाईचे आश्वासन दिले.
MLA Randhir Sawarkar : शिवसेनेच्या मंत्र्याकडे असलेल्या खात्यात गैरव्यवहार, भाजप नेत्याचा आरोप
आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी सभागृहात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे ते म्हणाले. यासोबतच, संविधानिक पदांवर असलेल्या नेत्यांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्यास कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
समाजात तणाव निर्माण करणारी आणि लोकशाहीला घातक ठरणारी वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मुख्यमंत्र्यांविषयी अशी विधानं करून आपल्या पक्षश्रेष्ठींची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात सभागृहात निवेदन द्यावे. लोकशाहीला मारक ठरणाऱ्या अशा वक्तव्यांवर सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.