BJP may contest local elections on it’s own : नवनीत राणा यांच्या वक्तव्याने युवा स्वाभीमान पक्षात संभ्रम
Amravati अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा माजी खासदार नवनीत राणा यांनी केल्यानंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र यामुळे त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्वबळाचा नारा देताना महायुतीतील घटक पक्षाला डावलले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अलीकडेच शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या पदग्रहण सोहळ्यात भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढवेल, अशी ठाम घोषणा केली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केले. मात्र, दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत.
MLA Randhir Sawarkar : कृषी विद्यापीठांमध्ये ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्याची गरज
नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक असून भाजपला विनाअट पाठिंबा दिला आहे. तरीही महापालिकेच्या तोंडावर नवनीत राणा यांनी स्वबळाची भूमिका मांडल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रवी राणा आणि भाजपचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यातील राजकीय कटुता ही काही नवीन नाही. जरी नवनीत राणा आणि पोटे सध्या भाजपच्या मंचावर एकत्र दिसत असले, तरी रवी राणा यांना भाजपच्या स्थानिक गटांकडून अद्यापही पूर्णतः स्वीकार मिळालेला नाही.
प्रवीण पोटे यांच्याकडून नुकतेच शहराध्यक्षपद काढून घेण्यात आले असून, त्यानंतर नवनीत राणा यांचे शहर राजकारणात वाढते वर्चस्व भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला खटकत आहे. डॉ. नितीन धांडे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली गेली असली तरी प्रत्यक्ष सूत्रे राणा दाम्पत्याकडेच असल्याची चर्चा आहे.
युवा स्वाभिमान पक्षाकडून नवनीत राणांच्या वक्तव्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते संभ्रमात असून, महापालिकेतील जागावाटप, प्रचार, व उमेदवारी यावर आता काय भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आणि राणा दाम्पत्याचा प्रभाव वाढल्याने पक्षाच्या अंतर्गत गणितांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.