Buldhana police issued notice before Mumbai protest : मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
Buldhana शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी त्यांना १६ मार्च रोजी नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव आंदोलन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये नमूद आहे. तुपकर यांनी या नोटीसला घाबरणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन व कापसाच्या भावफरकासह ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकांना मदत व भाववाढ यासाठी 19 मार्चला अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्तीची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच, सोयाबीन-कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात विदर्भासह विविध भागांमधील शेतकरी सहभागी होणार आहेत.
Mahayuti Government : राज्यात १२,४७३ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज!
18 मार्चला सकाळी 9 वाजता बुलढाणा येथील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटरवरून शेतकरी मुंबईकडे रवाना होणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कलम 168 अंतर्गत नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आंदोलन न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, रविकांत तुपकर यांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात रोष व्यक्त केला आहे.
‘अशा नोटिसेसने आमचे कपाट भरलेले आहे. आम्ही घाबरणार नाही, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणारच,’ असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही. कायदा हातात न घेता, लोकशाही मार्गाने लढा दिला जाईल, असे तुपकर यांनी सांगितले.
19 मार्च रोजी सकाळी नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रावर पोहोचून आंदोलन केले जाईल. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागण्यासाठी जात आहोत. त्यामुळे पोलिसांनी विनाकारण अडथळे आणू नयेत. जर आम्हाला मुंबईत जाण्यापासून रोखले, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.