Protester Farmers arrested in the sleep : शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी मध्यरात्री झोपेतून उठवून अटक केली. जवळपास 250 वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होणार होता. परंतु पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आता शेतकरी नेते रविकांत तूपकर यांनी केला आहे.
या प्रकारामुळे शेतकरी संभ्रमात पडले. हा केवळ एका आंदोलनाला विरोध करण्याचा नव्हे, तर राज्यातील शेतकरी चळवळ मोडीत काढण्याचा कुटील डाव आहे, असा आरोप तुपकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे गुन्हा आहे का? असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.
Ex-MLA Sanjay Raimulkar : काँग्रेस नेत्याचा माजी आमदारावर गंभीर आरोप
19 मार्चला मुंबईत अरबी समुद्रात कर्जाचे सातबारे आणि सोयाबीन बुडवून सत्याग्रह करण्याच्या नियोजित आंदोलनाला सरकार आणि पोलिसांनी गालबोट लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा आमचा घटनादत्त अधिकार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तुपकर म्हणाले, “सरकारने निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सत्ता मिळताच ते आश्वासन विसरले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पिकांना उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव आणि दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यास काहीच नाही आणि आंदोलनही करू द्यायचे नाही – हा कोणता न्याय?”
तुपकरांनी सरकारवर व्यक्तिगत पातळीवर दडपशाही करण्याचाही आरोप केला. “मी आंदोलन करतो म्हणून माझ्या आई, पत्नी, बहिणी आणि नातेवाईकांवर पोलिसांकडून दबाव टाकला जात आहे. शेतकऱ्यांसाठी लढणे हा गुन्हा आहे का? सरकार आम्हाला इतके का घाबरते?” असा सवाल त्यांनी केला.
Shinde Shivsena Vijay Ambhore : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा
“राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची सहनशीलता कमी लेखू नये. आम्ही बापाच्या घामाच्या दामासाठी लढतोय. अन्यायाविरोधात उभे राहणे गुन्हा असेल, तर आम्ही हा गुन्हा करत राहू. सरकारने जर आम्हाला न्याय दिला नाही, तर शेतकरी सातबारे नव्हे, तर सरकारलाच अरबी समुद्रात बुडवतील,” असा इशारा तुपकर यांनी दिला.
“पोलिसांच्या भीतीने नव्हे, तर आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहण्यासाठी मी सध्या भूमिगत आहे. 19 मार्चला आम्ही नियोजित सत्याग्रह करूच. अरबी समुद्रात सातबारे आणि सोयाबीन बुडवून सरकारचे लक्ष वेधणार आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.








