Ideal steps from Nikam Family : निकम परिवाराने उभा केला सामाजिक आदर्श
Buldhana भावाच्या निधनानंतर तरुण वयात विधवा झालेल्या वहिनीसाठी दिराने पित्याची भूमिका घेतली. मानस फाउंडेशनच्या मध्यमातून विधवा वहिनीचे लग्न जुळून आणण्यासाठी परिवाराची मानसिकताही तयार केली. तसेच मुलीच्या आई-वडिलांनाही विश्वासात घेतले व योग्य अनुरूप जोडीदार शोधून थाटामाटात लग्नही लावून दिले.
स्थळ शोधण्यापासून सर्व सोपसकार पार पडले व शेवटी बाप म्हणून वहिनीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कन्यादानही केले. भादोल्यातील ‘बाप माणूस’ वसंतराव निकम यांनी हा सामाजिक आदर्श उभा केलाय.
Chandrashekhar Bawankule : आधी सांडपाण्याची व्यवस्था नंतरच रस्ते
भादोला तालुका बुलढाणा येथील वसंतराव निकम यांचे लहाने बंधू – विजय यांच पाच वर्ष पूर्वी निधन झाले. त्यामुळे कमी वयात त्यांच्या वहिनी संजना यांच्यावर वैधव्याचा डोंगर कोसळला. विजय – संजना यांच्या पाच वर्षाच्या संसाराला दोन मुली रुपी फुलही उमलले. मात्र विजय यांच्या जाण्यामुळे हा परिवार पूर्णतः विस्कळीत झाला. घरातील व्यक्ती गेल्यानंतर मालमत्तेसाठी गृहकलह सुरू होतात.
विधवेकडे बघण्याच्या नजरा विचित्र असतात. मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम कार्य केलेल्या वसंतरावांनी गृहकलह बाजूला सारून त्यांच्या पत्नी आशा यांच्या मदतीने संजनासाठी स्थळ शोधण्याचा विचार केला. बुलढाण्यामध्ये मानस फाउंडेशनने याबाबत पुढाकार घेतला आहे. अनेक ठिकाणी लग्न जुळूनही आणले आहेत.
विधवांना जोडीदार देण्यासाठी प्राध्यापक डी एस लहाने सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे वसंतराव यांनी प्राध्यापक लहाने यांचे जवळ आपला विचार बोलून दाखवला. मानस फाउंडेशनने घेतलेल्या कार्याला हे बळ असल्याचे पाहून प्राध्यापक लहाने व वसंतराव निकम यांनी हा विवाह पार पाडला.
खामगाव जवळील मोहाडी येथे दिनांक 28 जानेवारी रोजी हा विवाह सोहळा समाजातील निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत नवरदेव सतीष परीहार अमडापुर या तरूणासोबत पार पडला. विशेष म्हणजे सतीषचे पहिले लग्न असून त्याने दोन मुलींनाही स्वीकारले.या सोहळ्यासाठी मानस फाउंडेशनच्या प्राध्यापक शहीनाताई पठाण प्रामुख्याने उपस्थित झाल्या होत्या.
निकम परिवारातील त्यांचे जेष्ठ बंधू डॉक्टर निकम, संजनाचे वडील सुखदेव भुसारी, आई द्वारकाबाई, सामाजिक कार्यकर्ते अनिल इंगळे, हिरालाल जैन, वानखेडे व शंकर भाऊ उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये सर्व सोपस्कार दिर वसंतरावांनी पार पाडले व शेवटी बापाच्या भूमिकेतून कन्यादानही केले. विधवा वहिनी च्या पाठीशी उभे राहणारा ‘बापमाणूस’ वसंतराव यांनी समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.