Guardian Minister and Co-Guardian Minister skip programme : बुलढाण्यात पालकमंत्री–सहपालकमंत्र्यांची दांडी, गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
Buldhana प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमालाही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री अनुपस्थित राहिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यात एक केंद्रीय राज्यमंत्री, एक राज्य कॅबिनेट मंत्री व शासनाने नियुक्त केलेले दोन मंत्री असे एकूण चार मंत्री असताना देखील जिल्हास्तरीय ध्वजारोहण थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले. यावरून जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.
राज्यभरात प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना बुलढाणा जिल्ह्यात मात्र पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असतानाही सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी बुलढाण्यात येणे टाळले. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे कामगार मंत्री आकाश पुंडकर व इतर नियुक्त मंत्री उपलब्ध असूनही कोणीही कार्यक्रमास हजर न राहिल्याने जिल्हावासीयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रवक्त्या जयश्री शेळके म्हणाल्या, “प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीही पालकमंत्री जिल्ह्यात उपस्थित राहत नाहीत, ही बुलढाण्यासाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे. पालकमंत्र्यांना वेळ नसेल, तर किमान सहपालकमंत्री तरी हजर राहू शकले असते. यावरून या सरकारला जिल्ह्यातील प्रश्न, विकास आणि जनतेच्या भावनांविषयी कोणतेही गांभीर्य नाही, हेच स्पष्ट होते.”
“हे मंत्री केवळ झेंडावंदनापुरते जिल्ह्यात येत होते, म्हणून त्यांना ‘झेंडावंदन मंत्री’ अशी बिरुदावली लागली. आता तर झेंडावंदनासाठीही हे मंत्री जिल्ह्यात येण्याचे टाळत आहेत.” जिल्ह्यावर होत असलेली ही उपेक्षा असह्य असून सरकार बुलढाण्याशी दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.








