supriya-sule-daughter-revati-sule-marriage-sarang-arun-lakhani-details : फडणवीस-गडकरींच्या मध्यस्थीची चर्चा
Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न ठरल्याची माहिती समोर आली असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रेवती सुळे यांचं लग्न सारंग अरुण लखानी यांच्यासोबत निश्चित झालं आहे. ही माहिती माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे.
सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असल्याने रेवती सुळे नागपूरची सून होणार आहेत. विशेष म्हणजे, रेवती सुळे यांचं हे नातं जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या विवाहाची चर्चा केवळ कौटुंबिक न राहता राजकीय पातळीवरही होताना दिसत आहे.
सारंग अरुण लखानी हे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र असून अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. सारंग लखानी यांची ओळख केवळ उद्योगजगतापुरती मर्यादित नाही, तर ते एक उत्तम बॅडमिंटनपटू म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या असून त्यांना विजय सुळे हा भाऊ आहे. रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलं आहे. राजकारणापासून काहीसे दूर असलेल्या रेवती सुळे यांनी नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रथमच आपल्या आईसाठी सक्रिय प्रचार करत सार्वजनिक जीवनात सहभाग घेतला होता.
Maharashtra politics : देवेंद्र फडणवीसांचा रात्रीचा गुप्त दिल्ली दौरा, पहाटे मुंबईत परतले!
शरद पवार कुटुंबातील या लग्नाच्या बातमीमुळे राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, लवकरच या विवाहासंदर्भातील अधिकृत कार्यक्रमांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








