Officials travelled by boat to catch SandMafia : पथकाने सिनेस्टाईल आवळल्या मुसक्या
Khamgaon जिल्हाभरात रेतीमाफीयांचा हैदाेस सुरू आहे. रेतीमाफीयांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार जळगाव जामाेद तालुक्यातील गाेळेगाव शिवारात महसूलच्या पथकाने बाेटीतून प्रवास करीत रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळल्या. पथकाने नदीपात्रातील १८ ते २० लाख रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या सिनेस्टाईल कारवाईची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात विविध नदीपात्रात सुमारे ४० वाळू घाट आहेत. या घाटांतून सातत्याने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असते. त्याबाबतच्या तक्रारीही होत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी शनिवारी बैठक घेतली. त्यामध्ये अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
Local Body Elections : निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच बाशिंग बांधून तयार !
पोलिस, आरटीओ आणि महसूल प्रशासनाने तक्रारींची गंभीर दखल घेऊन संयुक्तपणे ही कारवाई करावी. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुक करणाऱ्यांकडून दंड वसूल करावा. संशयित आणि विना क्रमांकाच्या वाहनांवर कारवाई करावी. अवैध वाळू वाहतुकीचे मार्ग बंद करावे, असेही बजावले. तसेच दोन दिवसांपूर्वीच उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यावर तहसीलदार पवन पाटील यांनी सकाळी दहा वाजतापासून पूर्णा नदीपात्रातील या मोहिमेला सुरुवात केली. त्यासाठी कोणत्याही गावातून जाणाऱ्या रस्त्याने जाण्याचे टाळले. त्यासाठी नैसर्गिक आपत्ती विभागाच्या बोटीतून त्यांनी प्रवास केला. गोळेगाव हुरसाड शिवारातील नदीपात्रात त्यांना रेती उपसा करणाऱ्या तीन केणी, दोन ट्रॅक्टर, एक सक्शन पंप सापडला तर माफियांनी तेथून पळ काढला. महसूल पथकाने साहित्य जप्त केले.
यावेळी पथकामध्ये तहसीलदार पाटील यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक बुलढाणाचे तारासिंग पवार, नायब तहसीलदार किटे, मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकळे, सातपुते यांच्यासह तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांचा सहभाग होता.
खडकपूर्णा नदीच्या पात्राची झाली चाळण
जिल्ह्यातील खडकपर्णा नदीच्या पात्रात माेठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे, नदीपात्राचे चाळण झाली आहे. महसूल विभागाच्या कारवायानंतरही उत्खनन सुरूच असल्याचे चित्र आहे.








