State-wide strike warning over suspension of Tehsildars : प्रशांत थोरात यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी; तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना आक्रमक
Buldhana निरोप समारंभात गाणे गायल्यामुळे निलंबित केलेले रेणापूर (जि. लातूर) येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन अन्यायकारक असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. “निलंबन मागे घेतले नाही, तर राज्यभर कामबंद!” असा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या वेळी जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ८ ऑगस्ट रोजी उमरी (नांदेड) येथून बदली होऊन रेणापूर (लातूर) येथे जाणाऱ्या प्रशांत थोरात यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी गाणे गायल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, जी संघटनेने अन्यायकारक ठरवली आहे.
Protest for loan waiver : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ‘काळा बैल पोळा’!
निवेदन देताना डॉ. रामेश्वर पुरी (एसडीओ खामगाव), शैलेश काळे (जळगाव जामोद), शरद पाटील (बुलढाणा), रवींद्र जोगी (मेहकर), संतोष शिंदे (मलकापूर), संजय खडसे (सिंदखेड राजा) यांच्यासह सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
मुख्य मागण्या
नायब तहसीलदारांची ग्रेड पे जुनी मागणी मंजूर करावी.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे मर्यादित केलेले अधिकार पुन्हा बहाल करावेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम १५५ अंतर्गत लेखन प्रमाण दुरुस्ती अधिकाराची व्याप्ती वाढवावी.








