Rohini Khadse criticizes Agriculture Minister Kokates ShaniDev Puja : कृषीमंत्री कोकाटे यांच्या शनिदेव पुजनावर रोहिणी खडसे यांची टीका
Nandurbar: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिमंदिरात पूजा केली. त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीतून सुटका व्हावी म्हणून मंत्री कोकाटे यांनी शनीदेवाची पूजा केली आहे. पण प्रत्यक्षात मंत्री कोकाटे हेच शेतकऱ्यांच्या मागे लागलेली ‘साडेसाती’ आहेत. या साडेसातीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली, तर मी स्वतः शनी देवाच्या दर्शनाला जाईन.
माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात पुण्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीतही कोकाटेंबाबत चर्चा झाली. सभागृहात रमी खेळणे आणि त्यानंतर केलेले वादग्रस्त विधान, ज्यात कोकाटेंनी सरकारला “भिकारी” म्हटले, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांचा राजीनामा लवकरच घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत कोकाटेंच्या भवितव्याबाबत अजित पवार निर्णय करू शकतात. दरम्यान नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज शनिमंदिरात पूजा केली. या पूजेबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट होवो, अशी प्रार्थना मी शनिदेवाच्या चरणी केली आहे. मात्र त्यांच्या या कृतीवरही विरोधकांकडून त्यांना लक्ष करण्यात येत आहे. रोहित पवार यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.
_____