Wifes statement will also be recorded; Police to investigate mental condition : पत्नीचा जबाबही होणार नोंद; पोलिसांकडून मानसिक स्थितीचा शोध
Mumbai : पवईतील ओलीस नाट्यानं संपूर्ण राज्य हादरवलं होतं. १७ मुलांना ओलीस धरून ठेवणारा रोहित आर्या पोलिसांच्या कारवाईत ठार झाला, पण या घटनेचा तपास आता नव्या दिशेने वळला आहे. गुन्हे शाखेने आर्याच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू केला असून लवकरच त्याची पत्नी आणि निकटवर्तीयांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. रोहित आर्याच्या मृत्यूपूर्वीच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी पोलिसांनी मानसशास्त्र तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासानुसार, या संपूर्ण ओलीस नाट्याचा कट रोहित आर्याने सुमारे तीन महिन्यांपूर्वीच रचला होता. त्याची नियोजनबद्ध तयारी सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी तो अत्यंत पॅनिक अवस्थेत होता. पोलिसांशी बोलताना अचानक चिडचिड करणे, फोन कट करणे आणि ओलीस ठेवलेल्या भागात सतत फेऱ्या मारणे या सर्व हालचालीतून त्याची मानसिक अस्थिरता स्पष्ट होत होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Political controversy : ‘निजामालाही ७०० बायका, त्याला काय अर्थ आहे’
तपास पथकाने आतापर्यंत तीन ते चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. पुढील टप्प्यात आर्याच्या पत्नीचा सविस्तर जबाब घेतला जाणार आहे. माहितीप्रमाणे, रोहित आर्याची पत्नी आणि मुलगा गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमध्ये राहत होते, तर आर्या चेंबूरमध्ये एकटाच भाड्याच्या घरात राहत होता. या कालावधीत त्याने अनेक आर्थिक व्यवहार केले असून, त्यांची चौकशीही सुरू आहे. पोलिसांकडून त्याचे बँक व्यवहार, व्यवहारात गुंतलेल्या व्यक्ती आणि त्याचे कम्युनिकेशन रेकॉर्ड्स तपासले जाणार आहेत.
दरम्यान, रोहित आर्याच्या मृत्यूबाबतही स्वतंत्र चौकशी सुरू झाली आहे. एनकाउंटर दरम्यान गोळी झाडणारे एपीआय अमोल वाघमारे यांचा जबाब गुन्हे शाखेने नोंदवला आहे. वाघमारे यांनी आपल्या जबाबात सांगितले की, “गोळीबाराचे आदेश नव्हते; पण परिस्थिती अशी निर्माण झाली की कारवाई करावी लागली.”
Maharashtra politics : महायुतीच्या एक वर्षात फुटकी कवडीही मिळाली नाही !
रोहित आर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा-२ आर्याच्या मृत्युची चौकशी करत आहे, तर गुन्हे शाखा-८ संपूर्ण ओलीस नाट्याच्या कटाचा मागोवा घेत आहे.
रोहित आर्याच्या मृतदेहावर पुण्यात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी मात्र अद्याप मौन बाळगले असून कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांचा तपास पुढील काही दिवसांत निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
______








