Rohit pawar : बारामतीतील विमान अपघात प्रकरणात नवा वाद, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

rohit-pawar-allegations-dgca-vsr-company-ajit-pawar-plane-crash-fir-demand : डीजीसीए आणि केंद्रीय मंत्र्यांकडून व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न

Mumbai : बारामतीतील कथित विमान अपघात प्रकरणाने नवे वळण घेतले असून आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय यंत्रणांवर थेट आरोप करत मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. 28 जानेवारी रोजी घडलेल्या या अपघातानंतर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी केंद्र पातळीवर हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर दावा केला.

रोहित पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या दिवशी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून पहिला अहवाल जारी करण्यात आला होता. त्या अहवालात फेब्रुवारी महिन्यात व्हीएसआर कंपनीच्या विमानाचे ऑडिट झाले असून लेव्हल-1 प्रकारातील कोणतीही गंभीर त्रुटी आढळली नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याच वेळी संबंधित नेत्याचे शवविच्छेदन सुरू असताना इतक्या घाईत अहवाल प्रसिद्ध करण्यामागे काय कारण होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Twin tunnel project : ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पाला प्रदूषणाचा फटका

त्यांनी पुढे आरोप केला की, त्या दिवशीच केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांनीही व्हीएसआर कंपनीच्या लियरजेट विमानात कोणतीही सुरक्षाविषयक त्रुटी नसल्याचे विधान केले होते. पायलटच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित न करण्याची भूमिका घेतली गेली होती. यावरून कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय अधिक गडद होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

काल प्रसिद्ध झालेल्या डीजीसीएच्या नव्या अहवालात मात्र विशेष ऑडिटदरम्यान विमानात अनेक त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. एअरवर्दीनेस प्रमाणपत्र, एअर सेफ्टी प्रक्रिया आणि फ्लाइट ऑपरेशन व्यवस्थापन या सर्वच स्तरांवर त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मात्र, तरीही कंपनीसाठी काही पळवाट शिल्लक ठेवण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. “तुमच्या हलगर्जीपणामुळे आमचा नेता गेला,” असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

या संपूर्ण प्रकरणात डीजीसीए, व्हीएसआर कंपनी, संबंधित एरो कंपनी आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आपण मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. गुन्हा दाखल न झाल्यास बारामतीत जाऊन पोलीस निरीक्षकांसमोर बसून राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Chandwad APMC : कांदा-मका भावघसरणीचे संकट; शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याची विनंती केली. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, असे सांगत त्यांनी राज्यभरात या विषयावर एफआयआर दाखल करण्याचे आवाहन केले. अपघाताच्या तपासात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर आणि प्रशासकीय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.