Rohit pawar : “बिघडलेले विमान अजितदादांना दिले का?” एफआयआर नोंदवण्यास नकारावर रोहित पवारांचा संताप

rohit-pawar-anger-over-ajit-pawar-plane-crash-fir-demand-vsr-company-baramati-police : व्हीएसआर, ॲरो कंपनी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

बारामती : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याच्या आरोपावरून आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचे चित्र आहे. बारामती पोलीस ठाण्यात तब्बल दोन तास चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. याआधी त्यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथेही एफआयआर करण्याचा प्रयत्न केला होता.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, डीजीसीएचा 24 फेब्रुवारीचा अहवाल समोर आल्यानंतर व्हीएसआर कंपनीकडून निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. त्या आधारे एफआयआर नोंद व्हावा, यासाठी आम्ही मुंबईत गेलो होतो. बीएनएसएस 2023 अंतर्गत ‘झिरो एफआयआर’ची तरतूद असून देशात कुठेही एफआयआर नोंदवता येतो आणि तो संबंधित ठिकाणी हस्तांतरित करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार असल्याचा दावा करत पोलिसांनी तक्रार स्वीकारलीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

love jihad law : भिगवण प्रकरणानंतर महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायद्याची गती

अपघात 28 जानेवारीला झाला, मात्र 24 फेब्रुवारीच्या डीजीसीए अहवालात व्हीएसआर कंपनीच्या कथित निष्काळजीपणाचा उल्लेख असल्याने आता गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अजित पवार ज्या ‘लेअर जेट 45 एक्सआर’ विमानातून प्रवास करत होते ते विमान व्हीएसआरकडे होते. 2023 मध्ये याच कंपनीचे एक विमान मुंबईत दुर्घटनाग्रस्त झाले होते. डीजीसीएच्या आदेशानंतर उर्वरित पाच विमान उड्डाणासाठी अयोग्य ठरवण्यात आल्याचा दावा करत, “जर इतर विमान थांबवली, तर अजितदादांना बिघडलेले विमान का दिले? ते चुकून दिले की मुद्दाम?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

त्यांनी स्पष्ट केले की एफआयआर हा व्हीएसआर कंपनी, तिचे मालक तसेच विमान उड्डाणास योग्य असल्याचे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आहे. विमान सुरक्षित आहे की नाही, हवामान अनुकूल आहे की नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असते. ‘अॅरो’ नावाच्या कंपनीकडून विमान नियोजन करण्यात आले होते आणि संबंधित व्हॉट्सअॅप संवाद सादर केल्याचा दावा त्यांनी केला. त्या संवादात हवामान ‘ओके’ असल्याचे सांगण्यात आले होते, असे ते म्हणाले. संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्रीय उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा मागितल्याच्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, एफआयआरमध्ये कोणत्याही मंत्र्याचे नाव घेतलेले नाही. मात्र जर व्हीएसआर कंपनीचे कोणत्याही राजकीय पक्षाशी व्यावसायिक संबंध असतील, तर नैतिक जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असे ते म्हणाले. आमचा उद्देश राजकारण नसून पारदर्शक चौकशी आहे, असा दावा त्यांनी केला.

Ajit Pawar plane accident : बारामती पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची गर्दी

एफआयआर का घेतला जात नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाचा संदर्भ दिला. “त्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर चौकशीची मागणी झाली. मग महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले अजित दादांसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबाबत तत्परता का दिसत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचा अहवाल दाखल झाल्याचे कारण देत एफआयआर नोंदवता येत नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या प्रकरणात कोणाचा दबाव आहे का, अशी शंका व्यक्त करत तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. बारामतीत या मुद्द्यावरून वातावरण तापले असून पुढील घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.