Threat of brute force, Rohit Pawar anger at Ashish Deshmukh : पाशवी बळावर धमकी, रोहित पवारांचा आशिष देशमुखांवर संताप
Mumbai: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना राजकीय वातावरण अधिक तापले आहे. प्रचारसभांमध्ये आरोप–प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू असतानाच कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठा वाद निर्माण केला आहे. “जास्त वळवळ केली तर कापून काढू” अशी थेट धमकी विरोधकांना देत देशमुखांनी जाहीर मंचावरून केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देशमुखांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापून काढू – हे शब्द कुण्या नक्षलवाद्याचे नाहीत तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी जाहीर व्यासपीठावरून विरोधकांना दिलेली धमकी आहे. राजकीय विरोध असावा, टीका असावी, पण विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता भाजप नेत्यांमध्ये येते कुठून? पाशवी सत्तेच्या बळावर विरोधकांना मारून टाकण्याची भाषा होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे.”
Local body election : 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, पण निकाल न्यायप्रविष्ट !
याच पोस्टमध्ये पुढे रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “सदा सर्वकाळ सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना विरोधकांचे एन्काऊंटर करण्याची परवानगी दिली आहे का? मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे; अन्यथा त्यांच्या मौनाचा अर्थच या भाषेला अप्रत्यक्ष पाठिंबा असा घेतला जाईल.”
आशिष देशमुखांनी ज्या प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही व्यासपीठावर उपस्थित होते. भाषणामध्ये देशमुख म्हणाले, “हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त वळवळ कराल तर कापून काढू.” विरोधकांना उद्देशून केलेल्या या थेट धमकीनंतर तिथल्या राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.
Local Body Elections : शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपसाठी मतांचा जोगवा
कळमेश्वरमध्ये नुकतेच एका काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने भाजपचा प्रचार करतो का? असा सवाल विचारत एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर कळमेश्वरातील राजकीय वातावरण तंग झाले होते. याच पार्श्वभूमीवर देशमुखांनी प्रचार सभेतून प्रत्युत्तर देताना कठोर आणि धमकीच्या सुरात हे विधान केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
घटनेनंतर सोशल मीडियावर देशमुखांच्या वक्तव्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून विरोधी पक्षाने हे प्रकरण लोकशाही आणि निवडणूक आचारसंहितेचा गंभीर भंग असल्याचा आरोप केला आहे. पुढे काय कारवाई होते याकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
___








