
rohit-pawar-ajit-pawar-plane-accident-press-conference-ncp-family-unity : रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन देणार महत्त्वाची माहिती
Baramati: बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात गंभीर शंका उपस्थित करत 10 फेब्रुवारी रोजी महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली. तसेच 12 फेब्रुवारीला मुंबईत स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत आतापर्यंत नेमके काय ठरले होते, याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी सांगितले की, अजितदादांची मनापासून इच्छा होती की पवार कुटुंबातील सर्वजण एकत्र यावेत आणि परिवार म्हणून एकजुटीने राहावे. त्या दृष्टीने दादांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. सुप्रिया सुळे, शरद पवार तसेच आम्ही सर्वजणही त्याच भूमिकेत होतो. दु:खद घटनेनंतर सलग 13 दिवस संपूर्ण कुटुंब एकत्र आहे, हे अजितदादांच्या स्वप्नाचीच पूर्तता असल्याचे त्यांनी म्हटले.
आज कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र मतदानासाठी पोहोचले, ही घटना देखील कुटुंबीयांमधील एकोप्याचे प्रतीक असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचे प्रतिबिंब दिसते, असे भावनिक विधानही त्यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्रीपद तसेच अजितदादांकडील सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे यावीत, ही आमची इच्छा होती आणि पुढील काळात त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली.
काल शरद पवार यांनी जय पवार तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलावून भावनिक मार्गदर्शन केले. अजितदादांच्या स्मरणार्थ काही उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली असून येत्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, असेही रोहित पवार यांनी सांगितले. पवार साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते थेट बोलावून मार्गदर्शन करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता रोहित पवार यांनी त्यावर थेट भाष्य टाळले. मात्र 10 फेब्रुवारीला अजित पवार यांच्या विमान अपघातासंबंधी काही अनुत्तरित प्रश्न आणि शंका जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच 12 फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणामागील भूमिका, दादांच्या मनातील विचार आणि आम्ही तो निर्णय का घ्यायला निघालो होतो, याचा खुलासा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Advantage Vidarbha : ‘महिंद्रा’ची नागपुरात १५,००० कोटींची गुंतवणूक!
अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. या दु:खातून सावरल्यानंतरच राजकीय विचारप्रक्रिया सुरू होईल आणि 9 फेब्रुवारीनंतर पुढील दिशा ठरवली जाईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.








