For the first time after independence, ST buses came to Tikhadi, Umra, Dudha villages in Nagpur district : पायी किंवा ट्रकसारख्या धोकादायक साधनांद्वारे करावा लागत होता जीवघेणा प्रवास
Umred : उमरेड तालुक्यातील तिखाडी, उमरा आणि दुधा या गावांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच एसटी बस सेवा सुरू झाली आहे. चांपा-परसोडी-डव्हा-खापरी मार्गावर बस सेवेचा अभाव आणि खराब रस्त्यांमुळे स्थानिकांना, विशेषतः महिलांना आणि विद्यार्थी, विद्यार्थीनींना पायी किंवा ट्रकसारख्या धोकादायक साधनांद्वारे जीवघेणा प्रवास करावा लागत होता. वाघाच्या दहशतीमुळे हा प्रवास अधिकच जोखमीचा बनला होता, ज्याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावरही होत होता.
काही दिवसांपूर्वी खापरी-परसोडी-हळदगाव मार्गे बस प्रवास करत असताना चांपा हद्दीत बस पलटण्याची घटना घडली होती. या अपघातात 35 शाळकरी विद्यार्थी प्रवास करत होते. परिसरातील अनेक क्रशर प्लांटमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे आणि पावसाळ्यात पाणी साचल्याने बस प्रवास धोकादायक झाला होता. या घटनेत सहा विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली, तर काहींना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
MSRTC : माटरगाव न जाता परतणाऱ्या बससमोर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
या घटनेनंतर विजय विद्यालयातील शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत उमरेड तहसीलदार मनोहर चव्हाण, कुही पोलीस निरीक्षक प्रशांत काळे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या आग्रहाने अधिकाऱ्यांनी बसने प्रवास करून रस्त्याची पाहणी केली. हळदगाव ग्रामपंचायतीत ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत जड वाहतूक बंद करण्याचा एकमताने ठराव मंजूर झाला.
India Alliance meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत !
चांपा ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली पवार आणि माजी सरपंच अतिश पवार यांनी या समस्येच्या निराकरणासाठी पुढाकार घेतला. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे आणि आगार प्रमुख कोकिरा कटरे यांची भेट घेऊन बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन आणि ठराव सादर केला. चांपा-हळदगाव-परसोडी मार्गे तिखाडी, उमरा, दुधा येथे बस सेवा सुरू करण्याची विनंती केली.
माजी सरपंच अतिश पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तिखाडी गावात प्रथमच एसटी बस पोहोचली. या ऐतिहासिक प्रसंगी उमरेड उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण, तहसीलदार मनोहर चव्हाण, नायब तहसीलदार राऊत, मंडळ अधिकारी आदेश बागेश्वर, तलाठी रामटेके, नेवारे, नंदरधने, बारामासे आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावातील महिलांनी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा करत बसचे स्वागत केले.
Vanchit Bahujan Aghadi : गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला मारहाण; मुख्य आरोपी अद्याप फरार
स्थानिक महिला संगीता गजानन चचाने, सरिता विनोद नेवारे, ललिता सुरेश नेवारे आणि अंजली नेवारे यांनी सांगितले की, खराब रस्त्यांमुळे बस येणे शक्य नव्हते, परंतु आता ही सेवा सुरू झाल्याने त्यांचे जीवन सुकर होईल. ही बस सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांना प्रवासाची सोय झाली असून, मुलींच्या शिक्षणाला आणि गावाच्या विकासाला चालना मिळेल.