Breaking

Safety of school students at stake : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर!

What happened to the order to install CCTV? : सीसीटीव्ही लावण्याच्या आदेशाला केराची टोपली

Gondia गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्यामागे शाळांची उदासीनता एक मुख्य कारण आहे. २१ ऑगस्ट २०२४ रोजी शासनाने शाळेत मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत निर्देश दिले होते. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटूनही केवळ १२ टक्के शाळांनी या निर्देशांचे पालन केले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील १६३८ शाळांपैकी फक्त १९० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात कठोर निर्णय घेतले होते. शासनाने शिक्षण विभागाला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये दिले आहेत. ज्यामधून प्रत्येक शाळेत एक लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये डीपीडीसी अथवा ग्रामपंचायतच्या शिक्षणासाठी राखीव ५ टक्के निधीतून कॅमेरे बसविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विशेष मोहीम राबवून सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याची गरज आहे. जि.प.च्या शाळांमध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतून तसेच लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे.

आजघडीला ५२ शाळांमध्ये तक्रारपेटी नाहीत, तर अनेक शाळांमध्ये सुरक्षा समिती केवळ कागदावर आहेत. ९८ शाळांत सखी सावित्री समिती आणि सुरक्षा समिती नाहीत. तक्रार पेट्यांचे कुलूप वर्षानुवर्षे उघडले जात नाहीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या कुलूपबंद राहतात.

बदलापूरमधील घटनेनंतर उपाययोजना!
बदलापूरमधील एका शाळेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये घडली होती. शाळेत साफसफाई करणाऱ्या एका तरुणाने हा प्रकार घडला होता. त्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्हीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता.