Car tire puncture due to iron sheet : समृद्धी महामार्गावरील घटनेची राज्यभर चर्चा
Washim
समृद्धी महामार्गावरील वनाेजा इंटरचेंजजवळ एका ट्रान्सपोर्टेशन ट्रकमधील लोखंडी पत्रा पडला हाेता. त्यामुळे, अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंक्चर वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली, तर चार तास धडपड करून टायर पंक्चर झालेल्या वाहनचालकांना मदतही केली. पण एका पत्र्याने अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाल्याने या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा झाली.
समृद्धी महामार्गावर वनोजानजीक इंटरचेंजवर रविवारी, दि. 29 डिसेंबर रात्री आठ वाजताच्या वाजताच्या सुमारास नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रान्सपोर्टेशन ट्रकमधील लोखंडी पत्रा खाली पडला. महामार्गावर सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या नजरेस तो पडला नाही. त्यामुळे जवळपास 13 वाहनांची चाके या ठिकाणी पंक्चर झाली.
ही माहिती महामार्ग पोलिसांना कळल्यानंतर लागलीच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंक्चर झालेली वाहने बाजूला करून 9.15 वाजताच्या सुमारास वाहतूक सुरळीत केली. यातील काही वाहनांचे एक, तर काही वाहनांची दोन चाके पंक्चर झाली होती. सोबत स्टेपनी असलेले आणि एक चाक पंक्चर झालेले वाहनचालक स्टेपनी लावून निघून गेले
तक्रारच दाखल नाही
समृद्धी महामार्गावर ज्या ट्रकमधील लोखंडी पत्रा पडल्याने वाहने पंक्चर होण्याच्या घटना घडल्या. तो ट्रक महामार्ग पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिला आणि त्याविरोधात तक्रार देण्याची सूचनाही वाहनचालकांना केली. तथापि, एकाही वाहनचालकाने त्या ट्रकचालकाविरोधात तक्रार देण्याची तयारीच दर्शविली नाही.
वाहतुक सुरळीत केली
घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केली. पण यामध्ये पोलिसांनी दाखविलेली तत्परता चर्चेची बाब ठरली. ज्या वाहनचालकांना टायर पंक्चर झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला, त्यांना महामार्ग पोलिसांनी मदत केली. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला. अशा परिस्थितीत पोलिसांची मदत मिळणे, ही दुर्मिळ बाब असते. पण समृद्धी महामार्गावर एवढ्या तत्परतेने मदत मिळाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.