Farmers’ land was taken for the highway, but no alternative road provided : विकासाच्या नावाखाली जमीन घेतली; पर्यायी रस्ता दिलाच नाही
Buldhana विकासाच्या नावाखाली जमीन घेतल्यानंतर शेतात जाण्यासाठीचा पर्यायी रस्ताही दिला नाही, यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई येथील शेतकरी संतप्त झाले असून, पंधरा दिवसांत मार्ग न दिल्यास समृद्धी महामार्गावर बैलगाड्या, जनावरांसह उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शेलगाव राऊत शिवारातील शेती समृद्धी महामार्गामुळे दोन भागांत विभागली गेली असून, सध्या त्या शेतीपर्यंत पोहोचण्याचा कुठलाही रस्ता उपलब्ध नाही. पीक पेरणीचा हंगाम सुरू असतानाच शेतकरी शेतात अडकले असून, यामुळे सिंचन, मशागत व पेरणीच्या कामांवर गंभीर परिणाम होत आहे.
विक्रम झोटे व इतर शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांच्याकडे निवेदन सादर करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त केला. “सरकारने जमीन घेताना आमचं मत विचारलं नाही, पण आता आमचं नुकसान भरून देणार कोण?” असा सवाल करत सरकारच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी थेट सवाल केला.
Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार !
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, दीड महिन्यांपासून रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असूनही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. स्थळ पंचनाम्यानंतरही फक्त आश्वासने दिली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला आहे.
शेतकऱ्यांचा निर्णायक इशारा – “रस्ता हवा, नाहीतर रस्ताच ठप्प”
शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पंधरा दिवसांत रस्ता न दिल्यास आम्ही बैलगाड्या व गुरेढोरे घेऊन थेट समृद्धी महामार्गावर उतरू, आणि महामार्ग ठप्प करू. यासाठी सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पोलिस यंत्रणेला निवेदनाची प्रत
या आंदोलनाची राजकीय व प्रशासकीय पातळीवर दखल घ्यावी म्हणून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, आमदार मनोज कायंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक, व किनगाव राजा पोलीस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. विक्रम झोटे, राधाकिसन सानप, भगवान सानप, पंढरीनाथ सानप यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.