BJP leader accused of taking ₹1 crore to defeat Shinde faction’s candidate : भाजपच्याच जिल्हा सचिवांचा दावा, नेत्यांवर ‘महायुती धर्मभंग’चा आरोप
Buldhana बुलडाणा जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. भाजपचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर विधानसभा निवडणुकीत आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध काम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून एक कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
बुलडाण्यातील मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर आयोजित पत्रकार परिषदेत अनंता शिंदे यांनी भाजपचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आमदार संजय गायकवाड व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
Local Body Elections : उलथापालथ झालीच, काकांचा उमेदवार पुतण्याच्या गळाला!
अनंता शिंदे यांनी सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत विजयराज शिंदे यांनी महायुती धर्म तोडून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रचार केला. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून एक कोटी रुपयांचा व्यवहार झाला. त्या रकमेत माझाही थोडा वाटा मिळाला, परंतु मला खंत वाटली की मी चुकीचे काम करीत आहे.”
ते पुढे म्हणाले, “भाजपमध्ये आता सेवा आणि समर्पण नाही, तर वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण वाढले आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांचा वापर करून त्यांना बाजूला केले जाते. त्यामुळे मी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”
प्रतापराव जाधवांविरुद्धही दावा
अनंता शिंदेंनी पुढे दावा केला की, “लोकसभा निवडणुकीदरम्यानही विजयराज शिंदेंनी महायुती धर्मभंग केला. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांविरुद्ध अर्ज भरून आर्थिक व्यवहार केला. मेहकरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत मी स्वतः उपस्थित होतो, तेव्हा पैशांची डील होताना पाहिली.”
या सर्व आरोपांवर जिल्हा भाजपाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा आरोप काही नवीन नाही. आमदार गायकवाड यांनी वर्षभरापूर्वी माझ्यावर पाच कोटींचा आरोप केला होता. आता तोच आरोप अनंता शिंदेच्या तोंडून करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
ते पुढे म्हणाले, “अनंता शिंदे वैफल्यग्रस्त झाला आहे. नगरपालिकेच्या तिकिटाच्या आमिषाने आणि आमदारांच्या दबावाखाली तो हे बोलत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप व पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन करून स्वतःचा राजकीय फायदा मिळवण्याचा गायकवाडांचा हा डाव आहे.”








