MLA Puram will improve bus service Follow-up continues with Pratap Sarnaik : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू
Gondia : आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आमदार संजय पुराम सरसावले आहेत. त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन याबाबत सकारात्मक चर्चा केली. या बैठकीत सालेकसा येथे नवीन बसस्थानकाच्या तातडीच्या उभारणीला गती देण्यासह, आमगावसाठी स्वतंत्र बसस्थानकाची जागा निश्चित करण्यात येणार आहे.
मतदारसंघात अधिक एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार पुराम यांनी केली. सालेकसा बसस्थानकाच्या उभारणीस वेग आला आहे. सालेकसा हे आमगाव-देवरी मतदारसंघातील महत्त्वाचे केंद्र आहे. येथे नव्या बसस्थानकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्याची गरज असल्याचे आमदार संजय पुराम यांनी स्पष्ट केले.
सालेकसातील नव्या बसस्थानकामुळे नागरिकांना चांगली वाहतूक सुविधा मिळेल आणि त्यांच्या अडचणी दूर होतील, असे त्यांनी सांगितले. या मागणीची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक दखल घेतली. लवकरच कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जागा निश्चिती अंतिम टप्प्यात..
आमगाव शहरात सध्या एसटीसाठी स्वतंत्र बसस्थानक उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य जागेची निवड करून तिथे बसस्थानक उभारण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जाणार असल्याचे आमदार पुराम यांनी सांगितले. आमगाव हे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. प्रवाशांसाठी सोयीस्कर जागेची लवकरच निवड करून बसस्थानक उभारण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन बसेस उपलब्ध करण्यावर भर..
ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी बससेवा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, अनेक ठिकाणी बससेवेच्या मर्यादेमुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आमदार संजय पुराम यांनी मतदारसंघात नवीन बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परिवहनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एसटीच्या ताफ्यात नव्या बसेस समाविष्ट होत आहेत. त्या टप्प्याटप्प्याने राज्यभर वितरित केल्या जातील. आमगाव-देवरी मतदारसंघालाही आवश्यक बसेस दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
Pratap Sarnaik : व्यवसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करावे
स्थानीक नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद..
आमदार संजय पुराम यांच्या या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या चर्चेनंतर लवकरच परिवहन विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून पुढील प्रक्रिया सुरू करणार आहेत.