Creditor battle among leaders over sports complex funds : रायमुलकर आणि खरात यांच्यात श्रेयवादाची लढाई
Buldhana तालुका क्रीडा संकुलाच्या निधीवरून आता नेत्यांमध्येच श्रेयवादाची कुस्ती सुरू झाली आहे. या वादामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघातील क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा आमदार सिद्धार्थ खरात यांनी दावा केला आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचं माजी आमदार संजय रायमुलकर यांनी म्हटलं आहे.
माझ्या कार्यकाळातच मेहकर व लोणार तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी चार कोटी रुपये मंजूर झाले होते, असा दावा रायमुलकर यांनी केला आहे. माजी आमदार रायमुलकर यांनी सांगितले की, “आमदार खरात यांनी क्रीडा मंत्र्यांचे पत्र प्रसिद्ध करून एक कोटी मंजूर केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्या पत्रातच शासन निर्णय क्रमांक आणि १५ ऑक्टोबर २०२४ चा संदर्भ दिला आहे. मी माझ्या कार्यकाळात क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांकडून १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मेहकर तालुका क्रीडा संकुलासाठी चार कोटी आणि लोणार तालुका क्रीडा संकुलासाठी चार कोटी रुपये मंजूर करून घेतले होते.”
Maharashtra Water Department : थकबाकीमुळे पाणीपुरवठ्यावर संकट!
रायमुलकर पुढे म्हणाले, “महायुती सरकारच्या कार्यकाळात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, मेहकर आणि लोणार तालुक्यांसाठी चार कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला. विद्यमान आमदारांनी एकही नवीन काम मंजूर करून न आणता, आम्ही मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.”
रायमुलकर यांनी सांगितले की, “मेहकर तालुका क्रीडा संकुलात ८० लाख रुपये खर्चाच्या संरक्षण भिंतीचे आणि ४० लाख रुपये खर्चाच्या बॅडमिंटन हॉल दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन मी स्वतः २३ डिसेंबर २०२४ रोजी केले आहे. अजूनही खेळाडूंकरिता विशेष धावपट्टी, संकुलाचे सौंदर्यीकरण, प्रेक्षक गॅलरीचे बांधकाम, तसेच मैदानाचे सपाटीकरण अशी कोट्यवधींची कामे बाकी आहेत. लोणार येथेही संरक्षण कुंपण, बॅडमिंटन हॉल आदी कामे प्रगतीपथावर आहेत. दोन्ही ठिकाणी यापूर्वीच मंजूर केलेल्या प्रत्येकी चार कोटी निधीतून ही सर्व कामे होत आहेत.”