Mahayuti Focusing on Local body Elections : राठोड यवतमाळचे, तर उईके चंद्रपूरचे पालकमंत्री
Yavatmal यवतमाळ जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मंत्री दिले आहेत. अगदी कुणाचेही सरकार असले तरीही अपवाद वगळता प्रत्येकवेळी यवतमाळला मंत्रिपद मिळाले आहे. यंदा यवतमाळला पालकमंत्रिपदाची दुहेरी लॉटरी लागली आहे. संजय राठोड आणि अशोक उईके या दोघांचीही पहिले राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यानंतर आता दोघेही पालकमंत्री झाले आहेत. राठोड यांच्याकडे यवतमाळची, तर उईके यांच्याकडे चंद्रपूरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संजय राठोड यांनी दिग्रस मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ते राज्याचे जलसंधारण मंत्री आहेत. अशोक उईके यांनी राळेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ते राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यापासून यवतमाळचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होती. अखेर शनिवारी (१८ जानेवारी) नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली.
पालकमंत्रिपदाची धुरा पुन्हा मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली, तर चंद्रपूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
शिवसेनेचे संजय राठोड हे २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर सलग पाच विधानसभा निवडणुकीत राठोड यांनी विजयाचा गुलाल उधळला. मागील टर्ममध्ये सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर येथील संदीपान भुमरे यांच्याकडे पालकमंत्रिपद होते. नंतर सत्ताबदल होऊन संजय राठोड यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा आली होती.
Local Body Elections : पंचायत समिती सभापतीची निवड दृष्टीपथात!
अशोक उईके हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तिसऱ्यांदा राळेगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे चंद्रपूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना महत्वाचे जिल्हे देऊन पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यातील राजकीय संघर्ष टाळला आहे. दोन्ही नेत्यांना आता विकासावर लक्ष केंद्रित करता येईल.
संजय राठोड यांनी मागील अडीच वर्षे यवतमाळच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे येथील प्रलंबित प्रश्नांची माहिती त्यांना आहे. आता पुन्हा त्यांच्याकडेच पालकमंत्रिपद आल्याने हे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, आगामी दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्याने या नियुक्तीला महत्व आहे.