Banjara Mahotsav in Pohradevi will be for five days : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची घोषणा
Washim संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी येथे होणारा बंजारा महोत्सव पुढील वर्षापासून पाच दिवसांचा होणार, अशी घोषणा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केली. महोत्सवात बंजारा संस्कृती, समाजजीवन आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे, असंही ते म्हणाले.
संत सेवालाल महाराज जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंजारा समाजाचे धर्मगुरू, महंत आणि आमदार बाबुसिंग महाराज होते. यावेळी महंत कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, यशवंत महाराज, सुनील महाराज, रायसिंग महाराज, शेखर महाराज, गोपाल महाराज, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार सईताई डहाके, आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिचंद राठोड, जीवन पाटील, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आणि वसंतनगरचे सरपंच गणेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
बंजारा महोत्सव नियोजनाच्या दृष्टीने कुंभमेळ्याच्या धर्तीवर आयोजित केला जाईल. समाजातील अनेक हिरे प्रसिद्धीपासून दूर राहून समाजसेवा करत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘सेवा’ पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. भविष्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन या पुरस्काराचे स्वरूप आणखी व्यापक करण्यात येईल, असंही मंत्री राठोड म्हणाले.
पोहरादेवीस आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळावे यासाठी ‘बंजारा विरासत’ नंगारा भवन प्रकल्प उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ना. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे पोहोचताच संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पाळण्याचे दर्शन, अरदास आणि भोग चढविण्याचा विधी पार पडला.
Indurikar Maharaj : सैन्यात शेतकऱ्यांची मुलं, ही शिवरायांची किमया !
कार्यक्रमात समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच पोहरादेवी आणि परिसरातील विकासकामांसाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना ‘सेवाध्वज’ प्रतिकृती देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिद्ध गायक नरेंद्र राठोड आणि संच यांनी बंजारा भजन आणि भक्तिगीत सादर केली. तसेच ‘संत सेवालाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सी. के. पवार यांची विशेष उपस्थिती होती. प्रास्ताविक महंत जितेंद्र महाराज यांनी केले, तर संचालन प्रा. राजेश चव्हाण यांनी केले.