Serious allegations against on government, strong criticism : महायुती सरकारवर गंभीर आरोप, तीव्र शब्दांत टीका
Mumbai : राज्यातील जलजीवन मिशनअंतर्गत काम करणाऱ्या तरुण मराठी उद्योजकाने आत्महत्या केल्यानंतर, संतापाची लाट उसळली आहे. हर्षल पाटील या उद्योजकाने सुमारे 80 लाख रुपयांचे कर्ज घेऊन 1 कोटी 40 लाखांचे काम पूर्ण केले, मात्र त्याचे बिले वेळेवर न मिळाल्याने शेवटी हतबल होऊन त्याने आयुष्य संपवले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट महायुती सरकारवर गंभीर आरोप करत, तीव्र शब्दांत टीका केली आहे.
फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी महाराष्ट्राचं स्मशान केलं आहे, असा घणाघात करत राऊत म्हणाले की, हर्षल पाटीलची आत्महत्या हा केवळ मानसिक तणाव नाही, तर सदोष मनुष्यवध आहे. सरकारच्या उदासीन धोरणांमुळे, वेळेवर मिळणारी बिले रखडल्यामुळे आणि कोणताही दिलासा न मिळाल्यामुळे अनेक ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. ही केवळ एक घटना नाही, तर ठेकेदारांच्या दैनंदिन संघर्षाचं जळजळीत उदाहरण आहे.
Nishikant Dubey : ‘पटक पटक के मारेंगे’ या वक्तव्याचा जाब विचारला
संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करत म्हटलं, ते दिल्लीला जाऊन काय दाखवणार आहेत? त्याऐवजी त्यांनी हर्षल पाटीलच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी होती. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू, त्यांचा आक्रोश बघितला असता, तर कदाचित सरकारला राज्यातली अस्वस्थता समजली असती.
मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच गडचिरोली दौऱ्यावर नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला. यावर टीका करत राऊत म्हणाले, शहरांमध्ये नक्षलवाद वाढतोय असं मुख्यमंत्री म्हणतात, पण नक्षलवाद तुमच्या पक्षातच आहे. दौंडमध्ये सत्ताधारी आमदाराच्या भावाने नर्तिकेवर गोळ्या झाडल्या. ही हिंमत कुठून येते? हेच नक्षलवाद नाही का? तुमचं सरकारच आता हिंसाचाराचं प्रतीक बनत चाललंय.
राऊतांनी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टोला लगावत म्हटलं, सरकारमध्ये सुरु असलेले हनी ट्रॅप प्रकरणे, अंतर्गत मारामाऱ्या हाही एक प्रकारचा नाजूक दहशतवादच आहे. लोकप्रतिनिधी आणि मंत्री जर असं वागू लागले, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका करत राऊत म्हणाले, फडणवीस फक्त गोड बोलत आहेत, गोलगप्प्यासारख्या गप्पा मारत आहेत.
पण महाराष्ट्रात गंभीर समस्या भडकत आहेत. आत्महत्या, कर्जबाजारीपणा, भ्रष्टाचार, हिंसा सगळं सुरू आहे आणि सरकार मौन बाळगून आहे.शेवटी, संजय राऊतांनी भावनिक हाक देत म्हटलं, हे सगळं थांबवा. महाराष्ट्र खतम होतोय, लुटला जातोय. राज्याची अब्रू रोज रोज चिरडली जातेय. वेळेवर पावले उचलली नाहीत, तर उद्याचा महाराष्ट्र असुरक्षित, अस्थिर आणि उदास वाटेल.