Rohit Pawar’s sensational allegation : रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Mumbai : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर तब्बल 5 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केला आहे. शिरसाट यांनी नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला 150 एकर जमीन दिल्याचा आरोप केला. या निर्णयामागे थेट आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी आणि तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
रोहित पवार म्हणाले, संजय शिरसाट यांनी 2024 मध्ये सिडको अध्यक्ष होताच 5 हजार कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाला दिली. हे कुटुंब इंग्रजांच्या काळात मराठा साम्राज्याशी गद्दारी करणारे आहे. स्थानिक भूमीपुत्रांच्या हक्कांवर गदा आणून शिरसाट यांनी गद्दारी केली आहे. या निर्णयामागे आर्थिक व्यवहार झालेला आहे. शिरसाट यांना 100 कोटी मिळाले असतील, तर त्यांच्या पक्षालाही 400 ते 500 कोटी मिळाले असण्याची शक्यता आहे.
ब्रिटिश काळात बिवलकर कुटुंबाला रोहा, पनवेल, अलिबाग परिसरातील 4 हजार एकर जमीन बक्षीस मिळाली. 1971 साली ही जमीन सरकारकडे जमा झाली, मात्र परत मिळवण्यासाठी त्यांनी सतत मागण्या सुरू ठेवल्या. 1990 मध्ये शरद पवार व डी. बा. पाटील यांनी आणलेल्या साडे बारा टक्के योजने अंतर्गतही त्यांची मागणी फेटाळली गेली.
23 फेब्रुवारी 2024 रोजी सिडकोचे नवे एमडी नियुक्त झाल्यानंतर शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निर्णय घेतल्याचा आरोप आहे. रोहित पवारांनी स्पष्ट मागणी केली की, “हा भ्रष्टाचार सरळसरळ आहे. सुप्रीम कोर्टाने झुडपी जंगल जमिनीबाबत दिलेल्या निकालानुसार बिवलकर कुटुंबाची जमीनही माघारी घ्यायला हवी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ स्पेशल टास्क फोर्स नेमावी किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी. शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा.
Bacchu Kadu : सरकारमधील लोकांकडून मतदारांची लिस्ट बदलण्याची होती ऑफर!
रोहित पवारांनी सांगितले की, 20 तारखेला सिडकोवर भव्य मोर्चा काढला जाणार आहे. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमच्या सोबत आहेत. तब्बल पाच हजार कोटींचा हा घोटाळा आम्ही उघड करणार आहोत. रोहित पवारांच्या या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शिरसाट यांना पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान देण्यात आले आहे. आता या गंभीर आरोपांना मंत्री संजय शिरसाट काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








