Shinde group also shocked after sitting ministers receive notice : विद्यमान मंत्र्यांना नोटीस मिळाल्याने खळबळ, शिंदे गटालाही धक्का
Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. संजय शिरसाट आणि शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ‘ व्हिटस्’ हॉटेलप्रकरणात शिरसाट यांना ही नोटीस आल्याचे समजते. शिरसाट यांनी एका कार्यक्रमात ही कबुली दिली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर आरोप करत अनेकक तक्रारी केल्या होत्या त्यानंतर आयकर खात्याने ही नोटीस बजावल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आयकर विभागाकडून नोटीस आल्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधान त्यांनी केले. तसेच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्यासही त्यांनी म्हटले आहे. 2019 साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर 2024 साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असं विचारल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.
Eknath Shinde : अधिवेशनाच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत
नोटीस बाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं, अशी माहिती देखील संजय शिरसाट यांनी दिली. पैसे कमावणे सोपं आहे. मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं शिरसाट यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले होते. शिरसाट यांच्या मुलाने हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटी रुपये असताना, केवळ 67 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप केला जात होता.
यानंतर संजय शिरसाट यांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, विरोधकांनी हा विषय लावून धरला. पावसाळी अधिवेशनात सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशीची घोषणा केली होती. त्यानंतर आता संजय शिरसाट यांना आयकर खात्याची नोटीस आल्याची माहिती समोर आली.
MLC Sanjay Khodke : अमरावतीत माफिया राज, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
त्यामुळे आता विटस हॉटेल प्रकरणात संजय शिरसाट यांच्या संपत्तीची झाडाझडती घेतली जाणार आणि त्यांची चौकशी केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी गटातील मंत्र्याविरोधात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि त्यापाठोपाठ आयकर खात्याची नोटीस, ही अलीकडच्या काळातील दुर्मिळ घटना मानली जात आहे. या सगळ्याचे महायुतीमधील अंतर्गत संबंधांवर काय परिणाम होणार, असा विषय पण या निमित्ताने चर्चेत आला आहे.
____