Signs of retirement as CIDCO scam case rages : सिडको घोटाळ्याचे प्रकरण गाजत असताना निवृत्तीचे संकेत
Mumbai : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “वयानुसार कधीतरी थांबायचं का? असा प्रश्न माझ्या मनात येतोय,” असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे. दीर्घकाळाच्या राजकीय प्रवासानंतर आता थोडं थांबण्याचा विचार त्यांच्या मनात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “मी दहा वर्ष नगरसेवक आणि वीस वर्ष आमदार आहे. ज्याची स्वप्नं कधी पाहिली नव्हती ती सगळी स्वप्नं पूर्ण झाली. मी अल्पसंतुष्ट माणूस आहे. मला आणखी काही पाहिजे, अशी भूक नाही. रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचं का? असा विचार मनात आला आहे.”
Cidco Land Scam : वनविभागाचे कबुलीपत्र, रोहित पवारांच्या आरोपांना दुजोरा
ते म्हणाले, “यासाठी कुणाचा दबाव नाही, ना वैतागून मी बोलतोय. मी आता 64 वर्षांचा आहे, लवकरच 65 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 2029 पर्यंत माझा राजकीय काळ आहे. तेव्हा मी 69 वर्षांचा होईन. त्यामुळे पुढचा विचार करणे साहजिकच आहे.”
शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, “राजकारण हा सेवेचा भाग आहे, पण माझ्याकडे सध्या मोठं खाते आहे, आणि मी चांगलं काम करत आहे. त्यामुळे आता आणखी काही हवं, अशा अपेक्षा नाहीत. मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे.”
Babanrao Taywade : राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी देऊ नये !
दरम्यान, नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. “मलिदा गँगचे मास्टरमाईंड संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्या आणि सरकारची विश्वासार्हता वाचवा,” अशी रोहित पवार यांनी मागणी केली.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत रोहित पवारांवर पलटवार केला. “सर्व पुरावे सिडको अधिकाऱ्यांकडे द्या. तुम्ही ज्यांच्यासोबत फिरता त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, बिवलकर यांच्या प्रश्नाला सामोरे जा. बिवलकर यांनी एसआयटी मागणी केली, तर ज्यांची दलाली करता त्यांचीही चौकशी झाली पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
Defender car case : एड्सग्रस्तांच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा गंभीर दावा
शिरसाट म्हणाले, “आरोप करणारे मूर्ख लोक आहेत. बेछूट आरोप करून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न सुरू आहे. सिडकोने यावर आधीच स्पष्टीकरण दिले आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय शिरसाट यांच्या निवृत्तीविषयीच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आले असतानाच, सिडको प्रकरणावरून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे त्यांच्या भूमिकेची आगामी काळात कसोटी लागणार आहे.
____








