Akola needs Amravati University’s sub-center : बुलडाणा, वाशीमच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मिटकरींची मागणी
Akola अमरावती लांब असल्याने अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात सुरू करावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी MLA Amol Mitkari यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असं उत्तर यावर दिलं.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांतील सुमारे ४ लाख विद्यार्थी आणि ४४० महाविद्यालये संलग्न आहेत. मात्र, अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना लहानशा कामांसाठीही शेकडो किलोमीटर प्रवास करून अमरावती गाठावे लागते. हा प्रवास आर्थिक, मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातूनही कष्टदायक ठरत आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, पूर्वी प्रमाणे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामांसाठी प्रत्यक्ष जावे लागायचे, परंतु आता बऱ्याच सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन उपकेंद्र स्थापन करताना प्रशासकीय कामकाजाबरोबरच इतर उपयुक्त शैक्षणिक सुविधा देता येतील का, यावर विचार सुरू आहे.
“सर्वच ठिकाणी उपकेंद्र स्थापन करण्याच्या मागण्या येत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोणत्या ठिकाणी उपकेंद्र आवश्यक आहे, याचा निर्णय घ्यावा,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. अकोला हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना ते अधिक सोयीचे ठरेल. वाशीम जिल्हा पूर्वी अकोला जिल्ह्याचा भाग होता, त्यामुळे अकोल्यात विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यास वाशीममधील विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फायदा होईल, असं मिटकरींनी स्पष्ट केलं.
या विषयावर झालेल्या चर्चेत आ. विक्रम काळे आणि भावना गवळी यांनीही सहभाग घेतला. तत्काळ दखल घेऊन अकोल्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अनावश्यक प्रवासाचा त्रास होणार नाही, अशी मागणी आमदारांनी अधिवेशनात केली.