Maratha community to hold protest on March 11 : ११ मार्चला आत्मक्लेष धरणे आंदोलन, कोरटकर, सोलापूरकर यांच्यावर कारवाईची मागणी
Akola अखंड गरजवंत मराठा समाजाची तातडीची जिल्हा बैठक अकोला येथे पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असा ठराव मांडण्यात आला.
विविध मागण्यांसाठी अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने ११ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आत्मक्लेष धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूर येथील प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यासह महापुरुषांची बदनामी केली. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
महापुरुषांची बदनामी करणारे चित्रपट, नाटक, लेख, कविता आणि भाषणे यांच्यावर बंदी घालण्यात यावी, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते देवराव पाटील हागे होते. यावेळी अखंड गरजवंत मराठा समाजाचे संयोजक राजेश देशमुख, समाजसेवक गजानन हरणे, पाटील समाजाचे ज्येष्ठ नेते प्रदीप खाडे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर, मराठा महासंघाचे राम मुळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रदीप चोरे उपस्थित होते.
धरणे आंदोलनात मराठा समाज, पाटील, देशमुख, कुणबी समाज तसेच परिवर्तनवादी बहुजन विचारांचे नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.