What exactly was decided in alliance talks, Santosh Dhuri big revelation : युतीच्या चर्चेत नेमकं काय ठरलं, संतोष धुरींचा मोठा गौप्यस्फोट
Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे मुंबईतील ज्येष्ठ नेते संतोष धुरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे ५३ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे १६४ जागा आहेत. मात्र, या युतीत मनसेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत संतोष धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. “आमचा पक्ष साहेबांनी त्यांना सरेंडर केला आहे. कागदावर आम्हाला ५२-५३ जागा दिल्यासारखं दिसतं, पण प्रत्यक्षात त्यातल्या फक्त ७-८ जागा जिंकता येतील की नाही, याचीच शंका आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Collector of Jalgao Jamod : मुख्याधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेविरोधात नगरसेवकांचा तीव्र निषेध
युतीच्या चर्चेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला दोन जागा देण्याचं ठरलेलं होतं, असा दावा धुरी यांनी केला. मात्र प्रत्यक्षात एका जागेवरच मनसेची बोळवण करण्यात आली, असं ते म्हणाले. “माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप अशा मराठी मतदार जास्त असलेल्या भागांत आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. पण तिथे आम्हाला फक्त एकाच जागेवर समाधान मानायला लावण्यात आलं. त्यांना ज्या हव्या होत्या त्या जागा त्यांनी स्वतःकडे ठेवल्या. १९४ वॉर्डचा विषयच चर्चेत नव्हता,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
पुढे बोलताना संतोष धुरी म्हणाले की, चर्चांमध्ये १९२ आणि १९० वॉर्डचे आकडे समोर ठेवण्यात आले. “मला कळेना की नेमकं घोडं कुठे अडलंय. प्रत्येक विधानसभेत दोन जागा देणार होते, असं सांगितलं जात होतं. १९४ मिळतोय असं सांगितलं, पण प्रत्यक्षात १९२ आणि १९०ही नीट मिळाले नाहीत. शेवटी मी सरदेसाई साहेबांना सांगितलं की, काय करायचं ते करा, पण मला मोकळं करा,” असं धुरी म्हणाले.
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टवर सापडले ड्रग्ज?
१९२ वॉर्ड मिळाला, पण तिथे दोन वेळा निवडून आलेल्या नगरसेवकाकडून तो वॉर्ड काढून घेण्यात आला, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला, असंही धुरी यांनी नमूद केलं. “मी मोठा नेता नाही, त्यामुळे या चर्चांमध्ये थेट सहभागी नव्हतो. तरीही साहेब सांगायचे, आम्हाला भरपूर मिळालं आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी संतोष धुरी यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. “संदीप देशपांडे यांना कुठल्याही चर्चेत सहभागी करून घेतलं गेलं नाही. त्यांना विचारण्यातही आलं नाही. साहेबांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे मनसेचे दोन किल्ले सरेंडर केले. बांद्र्यातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, हे दोघं कुठेही दिसता कामा नयेत. त्यामुळेच आम्हाला चर्चेपासून दूर ठेवलं गेलं,” असा दावा त्यांनी केला.
संतोष धुरी यांच्या या खुलाशांमुळे मनसे–उद्धव ठाकरे शिवसेना युतीतील अंतर्गत तणाव उघड झाला असून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हं दिसत आहेत.








