Toll-free helpline will be open from 8 am to 8 pm : सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार टोल-फ्री हेल्पलाईन
Akola : केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 (एक चार पाच सहा सात) ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि त्यांना आवश्यक सेवा पुरवणे हा आहे.
ही टोल-फ्री हेल्पलाईन सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे. मात्र, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर आणि १ मे या चार दिवशी सेवा उपलब्ध राहणार नाही, अशी माहिती जनसेवा फाऊंडेशनचे प्रतिनिधी राजेंद्र आहेर यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सेवेचा उद्देश आणि फायदे
हेल्पलाईनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक जागरूकता, निदान व उपचार सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच निवारा, डे केअर सेंटर, पोषणविषयक मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त उत्पादने, सांस्कृतिक व करमणूक विषयक माहिती आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळणार आहे.
विशेष सेवा
कायद्याविषयक मार्गदर्शन, विवाद निवारण, पेन्शनविषयक माहिती, मृत्यूपूर्वी आवश्यक दस्तऐवजांची तयारी, मानसिक ताणतणाव व्यवस्थापन, चिंता व ताणतणावांचे व्यवस्थापन, राग नियंत्रण, नातेसंबंधांतील समस्या सोडवणे आणि मृत्यूशी संबंधित शोक व्यवस्थापन.
शासकीय योजना आणि सुविधा
विविध शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ कसा घ्यावा यासाठी मार्गदर्शन. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अधिकाधिक जनजागृती करून ज्येष्ठ नागरिकांना या हेल्पलाईनचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हेल्पलाईन त्यांच्या दैनंदिन समस्यांवर सोप्या मार्गाने तोडगा काढण्यास मदत करणारी ठरणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.