A unique school run by alumni of Shirpur School in Wani Taluka of Yavatmal district : सायंकाळी रवाना झाले आणि पुन्हा सोडून गेले नव्या आठवणी.. त्याच गप्पांच्या गावात…
Shirpur – Yavatmal : लहानपणी शाळेत असताना एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसांची भीती, बोर्डाच्या परीक्षा, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावर खेळलेले खो-खो – कबड्डीचे डाव, शाळेचा निरोप घेताना मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस.. हे सर्व जिवंत केले यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील शिरपूर जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी.
सोशल मिडियाच्या माध्यमातून २०-३० वर्षांपूर्वीचे विद्यार्थी भेटले. नंतर त्यांनी गेट टूगेदर केले, हे किस्से नेहमीच ऐकायला, वाचायला मिळतात. पण शिरपूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी रविवारी (१३ एप्रिल) एका दिवसाची अनोखी शाळा भरवली. यामध्ये त्यांनी सन १९९८ ते २००५ या कालावधीत या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित केले आणि फक्त गेट टुगेदरसारखा कार्यक्रम केला नाही, तर चक्क एका दिवसाची शाळा भरवली आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या.
Vijay Wadettiwar : योजना लागू केली तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली होती का?
स्वागत, सत्कार आणि मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थीनींनी वर्ग भरवला. यामध्ये शिक्षकांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांचे पाठ घेतले. यावेळी चुकलेल्या विद्यार्थ्यांना छड्यासुद्धा खाव्या लागल्या. बालपणी छडी खाल्ल्यानंतर रडणारे विद्यार्थी या वर्गात आता छडी खाल्ल्यांवर मात्र हसत होते. पण या हास्यामध्ये त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या, हे होते आनंदाश्रू.
सन १९९८ ते २००५ या कालावधीत कार्यरत असलेले अर्धेअधीक शिक्षक आता निवृत्त झालेले आहेत. तर काही शिक्षक बदलून दुसऱ्या तालुक्यांत, जिल्ह्यांत गेलेले आहेत. पण एका दिवसाच्या शाळेसाठी सर्वजण दूरवरून सहपरिवार आले होते. या एका दिवसाच्या शाळेत आलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर गेलेले आहेत. कुणी राजकीय क्षेत्रात आहेत, तर कुणी प्रशासकीय सेवेत. येवढे मोठे झालेल्या विद्यार्थी आपल्या शिक्षकांना मात्र विसरले नाहीत, हे त्यांचे विशेष. बालपणी खाल्लेल्या छड्या त्यांना आठवल्या आणि सन २००५ नंतर तब्बल २० वर्षांनतर २०२५ मध्ये त्यांनी पुन्हा आपल्या त्याच शिक्षकांच्या हातून छड्या खाल्ल्या. याचे शिक्षकांनी व गावकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा झाली.
सन २००२ ते २००५ या कालावधीत शिरपूर शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका हर्षा वैद्य यांनी यावेळी शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्यावर कविता सादर केली.
वणी तालुक्यातील शिरपूर एक सुंदर गाव,
जिल्हा परिषद शाळेचा एक अर्थपूर्ण भाव..
२००२ साली झाली पहिली नियुक्ती माझी,
शिक्षक म्हणून ओळखीची मारली होती बाजी..
स्नेहमिलनाच्या या क्षणी मनात गर्दी भावनांची,
उचंबळून आली ती लाट सगळ्या आठवणींची..
विद्यार्थ्यांनो तुमच्या मनातील भाव आज येथे दिसला,
गुरूजनांची आठवण, त्यांचा सन्मान येथे पाहिला..
पुन्हा एकदा गोड आठवणींना उजाळा देऊ या.. गप्पांच्या गावात मैफलीत रंग भरुया.., असे म्हणत ही एका दिवसाची शाळा विद्यार्थ्यांनी जिवंत केली. कटू-गोड आठवणी स्मरल्या. दिवसभर आनंदोत्सव साजरा केला, जल्लोश केला. गत काळातील आठवणींना ऊजाळा देत भविष्यासाठी शिदोरी बांधून शिक्षक व विद्यार्थी सायंकाळी आपआपल्या गावी रवाना झाले आणि पुन्हा सोडून गेले नव्या आठवणी.. त्यांच गप्पांच्या गावात…
एका दिवसाच्या शाळेत निवृत्त केंद्रप्रमुख प्रल्हाद सिडाम, निवृत्त गटशिक्षणाधिकारी स्नेहलता सिडाम, निवृत्त शिक्षक लांडे, भगत, मुरलीधर लेडांगे , अनिल राजुरकर, गोकुळ इंगोले, तर विद्यमान शिक्षीका हर्षा वैद्य-मेहेरे, शिक्षक गोपाल गायनर, सतीश एकरे, किरण कुसराम व मेश्राम हे शिक्षकगण आणि जिवेंद्र वाघमारे, विनय मंदीलकर, मंगेश नान्ने, गणेश डहाके, आनंद ठमके, अतुल निकुरे, सुवर्णा हजारे, जया वाणी, जयश्री निबुदे, सीमा राऊत, सुचिता टेकाम, कविता टेकाम, सुनील भोयर, किरण उईके, अश्पाक बेग आणि घनश्याम पोटे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन जयश्री निबुदे यांनी केले, उपस्थितांचा परिचय सीमा राऊत यांनी दिला. तर आभार प्रियदर्शीनी बोंडे यांनी मानले.