Shiv Jayanti 2026 : एनसीईआरटीच्या पुस्तकातून १७५९ मधील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; मुधोजीराजे भोसले यांचा गंभीर आरोप

nagpur-mudhoji-raje-bhosale-allegation-ncert-removed-1759-maratha-empire-map : राजपूत घराण्यांच्या दबावाखाली कारवाई झाल्याचा दावा; ‘कटक ते अटक’ विस्तार नाकारणे म्हणजे इतिहासाशी छेडछाड

Nagpur नागपूरमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूरकर भोसले राजघराण्याचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी एनसीईआरटीच्या आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातील १७५९ सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा एकतर्फी हटवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित नकाशा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पुस्तकातून वगळण्यात आला असून, ही कारवाई राजस्थानमधील काही राजपूत घराण्यांच्या दबावाखाली करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

हटवलेला नकाशा तातडीने पुन्हा प्रकाशित करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. एनसीईआरटीच्या आठवीच्या इतिहास पुस्तकात १७५९ मधील मराठा साम्राज्याचा “कटक ते अटक” असा विस्तार दाखवणारा नकाशा समाविष्ट होता. मात्र, राजस्थानमधील काही राजघराणी आणि राजपूत संघटनांनी त्या नकाशावर आक्षेप घेत मराठ्यांचे अधिपत्य राजस्थानच्या काही भागात नव्हते, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे निवेदने देऊन तो नकाशा हटवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर एनसीईआरटीने संबंधित नकाशा पुढील आवृत्तीतून वगळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis, Mahavitaran : विजेच्या दरात खरोखरच कपात होणार? महावितरणच्या अध्यक्षांचा दावा

या संदर्भात महाराष्ट्रातील काही तरुणांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) अर्ज दाखल केल्यानंतर नकाशा हटवण्यात आल्याची बाब समोर आली. मुधोजीराजे भोसले यांनी दावा केला की, नकाशा पुनरावलोकनासाठी कार्यरत असलेल्या समितीत महाराष्ट्रातील एकही जाणकार इतिहासतज्ज्ञ नव्हता. ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनानंतर समितीवर मराठी प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

इतिहासातील नोंदींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करताना त्यांनी मुघल आणि मराठे यांच्यात झालेल्या “अहमदिया तह”चा उल्लेख केला. मुघलांनी अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणांपासून संरक्षण मिळावे यासाठी राजस्थानचा काही भाग मराठ्यांच्या संरक्षणाखाली दिला होता, असा त्यांचा दावा आहे. या तहाकडे आणि मराठा साम्राज्याच्या वास्तविक विस्ताराकडे एनसीईआरटीने दुर्लक्ष केले असल्याचे ते म्हणाले.

Shivaji maharaj jayanti छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती राज्यभर उत्साहात

‘कटक ते अटक’पर्यंत मराठा साम्राज्य विस्तारले असताना राजस्थानचा भाग अधिपत्याखाली नव्हता, तर मराठे अटकेपर्यंत पोहोचले कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा साम्राज्याचा वैभवशाली इतिहास दर्शवणारा नकाशा पुस्तकातून हटवणे म्हणजे ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील लोकप्रतिनिधींनी हा विषय गांभीर्याने घेऊन केंद्र स्तरावर पाठपुरावा करावा आणि मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा पुन्हा इतिहास पुस्तकात समाविष्ट व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.