Breaking

Shiv Sena : युरोपात जाऊन मराठी बाणा – झाला उताणा !

Marathi Bana – Uddhav Thackeray is facing widespread criticism after going to Europe : सर्वपक्षीय बैठकीकडेही फिरवली पाठ

Nagpur : ‘मराठी बाणा’चा उदो उदो करणारे शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख सध्या कुुटुंबीयांसमवेत युपोरात सुट्या घालवत आहेत. यावरून त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्ष तर टीका करणारच, पण आता त्यांच्या पक्षातील लोकही खासगीत उद्धव ठाकरेंवर दबक्या आवाजात टीका करू लागले आहेत.

जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातीलही लोक ठार झाले. काही जखमी झाले. यात बव्हंशी मराठी लोक होते. त्या परिस्थितीत प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपल्या परीने जम्मू – काश्मीरमध्ये फसलेल्या मराठी माणसाला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्या लोकांना सुरक्षीत परत आणण्यासाठी तेथे तळ ठोकून होते. पण सदानकदा ‘मराठी बाणा’ची आरोळी ठोकणारे उद्धव ठाकरे मात्र युरोपात कुटुंबीयांसमवेत सुट्या घालवण्यासाठी आणि फोटोग्राफी करण्यासाठी गेले. त्यावरून ‘युरोपात जाऊन मराठी बाणा – झाला उताणा’, असेच म्हणता येईल.

Shiv Sena : कारकर दाम्पत्य शिवसेनेत, उबाठाला आणखी एक धक्का !

देशावर येवढे मोठे संकट आले असताना काँग्रेस असो किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस.. याशिवाय सर्वच लहान मोठ्या राजकीय पक्षांना केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण दिले होते. राष्ट्रीय संकटात तरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन भूमिका घेतली पाहिजे. केंद्र सरकारचा टोकाचा विरोध करणाऱ्या पक्षांनीही या बैठकीला हजेरी लावली आणि राष्ट्रीय आपत्तीमध्ये आपण सरकारच्या सोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले. पण या बैठकीकडेही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने पाठ फिरवली. त्यामुळे ते टिकेचे लक्ष्य ठरले.

नेते युरोपात अन् कार्यकर्ते कोमात..
‘लढ बापू लढ..’, असे म्हणताना नेत्याने कार्यकर्त्यांच्या सोबत असायला हवे. पण उबाठाकडून असे काही होताना दिसत नाही. केवळ भाषणे ठोकून सकाळचे भोंगे वाजवले जातात. इकडे एकनाथ शिंदे उबाठाला दररोज कुठे ना कुठे खिंडार पाडत आहे, अन् उद्धव ठाकरे युरोपात सुट्या घालवत आहेत. नाही देशासाठी पण आपल्या पक्षासाठी तरी उद्धव ठाकरेंनी या काळात ‘हेड क्वार्टरला’ असायला हवे, असे आता त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलू लागले आहेत.

Shiv Sena – NCP : काका – पुतण्या आणि दोघे भाऊ एक झाले तर स्वागतच !

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य मराठी माणसाची आणि सर्वसामान्य माणसांसाठी शिवसेना स्थापन केली होती. त्यांनी ऑटोचालक, पेंटर, कारपेंटर, पानठेला चालक अशा अतिसामान्य लोकांना आमदार, खासदार अन् मंत्री बनवले. पण स्वतः कधीही सत्तेच्या खुर्चीवर बसले नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसले, तेव्हाच त्यांची शिवसेना अर्धी संपली होती, असे राजकीय जाणकार सांगतात. शिवसेना ही सर्वसामान्य माणसाची आहे. ही सेना घरात बसून नव्हे, तर रस्त्यावर उतरून चालवावी लागते. उद्धव ठाकरेंनी घरात बसून पक्ष चालवण्याचा केलेला प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट येतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत होणार आहेत. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. अशात उद्धव ठाकरे सुट्या आणि फोटोग्राफीत मग्न आहेत. त्यामुळे याही निवडणुकीत त्यांची विधानसभा निवडणुकीसारखी गत होणार नाही, याची शाश्वती देता येणार नाही.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.