Shivsena changed local body executive : दोन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख मंगेश काळे, गोपाल दातकर कायम
Akola उद्धव सेनेच्या पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. शिवसेना उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी मंगेश काळे यांच्याकडे सोपवली आहे. याशिवाय, सरिता वाकोडे यांची महिला जिल्हा संघटक, तर मंजुषा शेळके यांची जिल्हा सहसंपर्क संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांना कायम ठेवण्यात आले आहे. या बदलांना रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.
राज्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बांधणी अधिक बळकट करण्यासाठी हे फेरबदल करण्यात आले आहेत. मंगेश काळे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आमदार नितीन देशमुख यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला होता. विदर्भ संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांनाही हा प्रस्ताव दिला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोट आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असेल.
महिला संघटनेचा विस्तार करण्यासाठी सरिता वाकोडे यांना अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि बाळापूर या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. मंजुषा शेळके यांना सहसंपर्क संघटक म्हणून महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी नितीन देशमुख यांना अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांचे नेतृत्व सोपवले आहे. अकोला जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातील संघटनात्मक फेरबदल पक्षनेतृत्वाने मान्य केले आहेत.
Ajit Pawar : महाराष्ट्रातील खेळाडुंनी देशाला मिळवून दिले पहिले खोखो विश्वविजेते पद !
निवडणुका डोळ्यापुढे ठेवून बदल
येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. अशा परिस्थितीत किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी आपले अस्तित्व कायम राहावे, यासाठी ठाकरे गट कामाला लागला आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.