Sushma Andhare Slams Govt: Questions Themselves Prove Uncomfortable : अजूनही सरकार कर्जमाफी बाबत बोलायला तयार नाही
Nagpur : महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पूरपरिस्थिती आहे. कुठलीही शासकीय मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्य सरकार कर्जमाफीसंदर्भातही बोलायला तयार नाही. पीएम केअर फंडचे १० हजार ९९० कोटी रुपये आहेत आणि फक्त तीन हजार ६७८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. एक तृतीआंश रक्कम फक्त खर्च झाली आहे. उर्वरीत रकमेचे काय झाले, असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
संविधान सत्याग्रह पदयात्रेसाठी आज (२९ सप्टेंबर) नागपुरात आल्या असता, सुषमा अंधार पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, पीएम केअर फंडचे पैसे एका पब्लीक चॅरिटेबल ट्रस्टला का जमा केले. आपत्ती व्यवस्थापनाची वेळ असतानाही ते पैसे का मिळत नाहीयेत? पण असे प्रश्न विचारणेही सरकारला खपत नाही. त्यांना आमचे प्रश्न झोंबतात. मत चोरीचा प्रश्न आहे, जस्टीस लोया हत्या प्रकरण आहे, आपत्ती काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रश्न आहे. पण असे प्रश्न विचारले तर सरकारला झोंबतात.
Constitution Satyagraha March : तुषार गांधी यांच्या नेतृत्वात संविधान सत्याग्रह पदयात्रा सुरू !
संविधान सत्याग्रह यात्रेसंदर्भात प्रश्न विचारला असता, उपरोक्त विषयांवर चर्चा घडवून आणणे आणि लोकजागृती घडवून आणणे, हेच संविधान सत्याग्रह यात्रेचे उद्दीष्ट आहे. ही यात्रा कुठल्या एका राजकीय पक्षाची नाही, तर सर्व जनतेची आहे. ज्यांना – ज्यांना लोकशाहीवर प्रेम आहे आणि हुकूमशाहीचा तिरस्कार आहे, त्या सर्वांसाठी ही यात्रा आहे, बहुजनांचे ऊर्जास्थान असलेल्या दिक्षाभूमीतून या संविधान सत्याग्रह पदयात्रेची सुरूवात होत आहे आणि २ ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी तेथे सभासुद्धा होणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.